

David Cohen lobbying mentor
esakal
विवेक पंडित - pvivek2308@gmail.com
डेव्हिड कोहेन यांनी प्रत्यक्ष संघटना बांधणीचं काम केलं नव्हतं; परंतु अमेरिकेत कामगारांच्या आणि नागरिकांच्या संघटनांना धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवणं अन् त्यांच्या माध्यमातून धोरणांवर प्रभाव टाकणं, याचं प्रशिक्षण कोहेन देत. मला त्यांचा सहवास डॉ. बेरील रॅडीन यांच्याइतकाच जवळून मिळाला. असंख्य वेळा व्यक्तिगत चर्चांमधून मला त्यांच्याकडून धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल आणि तिला गतिमान करणाऱ्या घटकांबद्दल शिकता आलं.
९० च्या सुमारास माझं ॲडव्होकसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘ॲडव्होकसी’ या विषयातलं पहिलं प्रशिक्षण झालं. त्यानंतर जवळपास वर्षाआड ॲडव्होकसी इन्स्टिट्यूटमध्ये मला ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून निमंत्रित केलं जात असे, हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा बहुमान मला वाटतो. केवळ भारतातल्याच नाही; तर जगभरातल्या संस्था-संघटनांचे प्रमुख, वर्तमानपत्रांशी संबंधित तसेच शासकीय अधिकारी या प्रशिक्षणाला येत असत. इथे ॲडव्होकसीचं तंत्र शिकवलं जाई; पण प्रत्यक्ष संघर्ष करताना ॲडव्होकसीचा वापर कसा करता येतो, याबाबतची संघटनेच्या अनुभवांची पार्श्वभूमी या संस्थेत अभावाने असल्याने मला निमंत्रित केले जाई. इथे ॲडव्होकसीचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याआधीही संघटना म्हणून आम्ही विविध संघर्षांमध्ये कधी मुख्यमंत्री; कधी विधिमंडळ सदस्य; तर कधी आदिवासी, शिक्षण, रोजगार खात्यांचे मंत्री तसेच सचिवांना वारंवार भेटत होतोच... त्यांना आमचा मुद्दा, हक्क, मागण्या समजावून, पटवून देत होतो... धोरणांवर प्रभाव टाकून आमच्या मागण्या, हक्क धोरणात समाविष्ट करून धोरण बदलून घेत होतो आणि धोरणांच्या अंमलबजावणीवरही प्रभाव टाकत होतोच... मग वेठबिगार मुक्तीसाठीचा संघर्ष असो किंवा सिद्धपीठाचा लढा असो... फक्त आम्ही जे करत होतो, त्याला ‘ॲडव्होकसी’ म्हणतात, हे आम्हाला ठाऊक नव्हतं. अमेरिकेतल्या ॲडव्होकसी इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेताना माझ्या लक्षात आलं, की आम्हीही संघटना म्हणून आदिवासींच्या, वेठबिगारांच्या संबंधित धोरणांवर, त्यांच्या अंमलबजावणीवर प्रभाव टाकतच होतो... त्यामुळे आम्ही आमच्याही नकळत ‘ॲडव्होकसी’ करीत होतो... या इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि संचालक डेव्हिड कोहेन यांच्याशी माझा परिचय झाला.