
प्रसाद कानडे
Prasad.Kanade@esakal.com
दे शाला स्वातंत्र्य मिळून दोन वर्षांचा काळ लोटला होता. प्रगतीच्या दिशेने देशाने पावले टाकण्यास सुरुवात झाली होती. हवाई क्षेत्राच्या बाबतीत देखील हीच स्थिती होती. मात्र देशाने हवाई क्षेत्रात प्रगती करावी, चांगले वैमानिक घडावेत या हेतूने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात ''ग्लायडिंग सेंटर'' सुरू करण्याचा निर्णय घेतला. आताची ‘डीजीसीए’ तेव्हा ती डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणून ओळखली जात. दिल्लीहून फर्मान सुटले. देशातील १७ शहरांत ‘ग्लायडिंग सेंटर’ निर्माण करण्याचे ठरले. पुण्याजवळील हडपसर येथे ‘ग्लायडिंग सेंटर’ तयार करण्याचे ठरले.
‘ग्लायडिंग सेंटर’ जिथे वैमानिकांच्या स्वप्नाला पंख मिळते असे ठिकाण. १९५० च्या दशकात सुरू झालेले ‘ग्लायडिंग सेंटर’ कालौघात बंद पडत गेले. देशात आता एकमेव राहिलेले हडपसरचे ‘ग्लायडिंग सेंटर’ने ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पण दुर्दैवाने ते एका दुष्टचक्रात अडकले आहे. ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने पुण्याच्या ‘ग्लायडिंग सेंटर’ने घेतलेल्या भरारीचा हा वेध.