
सप्तकोटेश्वर मंदिर, गोवा
esakal
दरम्यान, आदिलशाही सैन्य मुघल सीमेजवळ उपद्रव करू लागले. त्या सैन्याला रोखण्यासाठी जयसिंहाने बाबाजी भोसलेसह अनेक सरदारांना विविध ठिकाणी नेमले. सुरुवातीला आदिलशाही सैन्याचा पराभव झाला, परंतु लवकरच त्या सैन्याने बळ एकवटून दौंडजवळ अचानक हल्ला करीत मुघलांचा पराभव केला. या हालचालींमुळे जयसिंह अस्वस्थ झाला; त्याने स्वतः मोहिमेवर जाण्याचा विचार केला, परंतु विजापूरकरांच्या संधीसाधूपणामुळे अराजकता निर्माण होईल या भीतीने त्याने तो विचार सोडून दिला. अखेरीस त्याने अब्दुल हमीद याला पाच हजार सैन्यासह त्या भागात पाठविले.
मराठ्यांच्या हालचालीही तितक्याच गतिमान होत्या. रोहिडा किल्ल्याचा किल्लेदार सय्यद मसूद याने जयसिंहाकडे तक्रार केली की, मराठा सैनिक किल्ल्याभोवती दारूगोळा आणि अग्निबाण जमा करीत आहेत. त्यावर जयसिंहाने किल्ल्यात त्वरित अन्नधान्य पाठविण्याचे आदेश देऊन गरज पडल्यास पायदळ तयार ठेवण्यास सांगितले.
या घटनांमुळे खचलेला जयसिंह आता कपटी डाव रचू लागला. वजीर जाफरखानाला लिहिलेल्या पत्रात त्याने शिवाजी महाराजांना भेटीस बोलावून त्यांच्या परतीच्या मार्गातच त्यांचा अंत करण्याचा विचार व्यक्त केला. त्याचबरोबर विवाहसंबंधाचे आमिष दाखवून शिवाजी महाराजांना फसविता येईल, असे अपमानकारक शब्द पत्रात वापरले. परंतु दूरदृष्टी आणि चातुर्य यांचा संगम असलेले शिवाजी महाराज अशा सापळ्यात अडकणे शक्यच नव्हते.
शेवटी, जयसिंहाकडून दख्खनेची सुबादारी काढून घेण्यात आली आणि त्याच्या जागी शाहजादा मुअज्जम याची नेमणूक झाली. १० जानेवारी, १६६७ रोजी जयसिंह भीमा नदी पार करून औरंगाबादकडे परतला. मे महिन्यात शाहजादा मुअज्जम याने येऊन कारभार स्वीकारला. अपयशाच्या दुःखाने व्यथित झालेला जयसिंह उत्तरेकडे परतत असताना २८ ऑगस्ट, १६६७ रोजी बुऱ्हानपूर येथे मृत्यू पावला.