esakal | आपल्या प्रेमींना जिवंत जाळणारी राणी
sakal

बोलून बातमी शोधा

आपल्या प्रेमींना जिवंत जाळणारी राणी}

आपल्या प्रेमींना जिवंत जाळणारी राणी

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

इतिहासाच्या पुस्तकांवर नजर टाकली, तर आफ्रिकेतील अंगोला देशातील क्वीन एनजिंगा एमबांदीला 17 व्या शतकात आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवादाविरुद्ध युद्ध छेडणारी एक शूर व धारदार विचारसरणीची योद्धा म्हणून पाहिले जाते. पण काही लोक तिच्याकडे एक क्रूर स्त्री म्हणून देखील पाहतात, जिने सत्तेसाठी आपल्या भावाची हत्या केली. एवढेच नव्हे तर तिच्या प्रेमींशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर ती त्यांना जाळून टाकायची. परंतु, इतिहासकार एका गोष्टीवर सहमत आहेत आणि ते म्हणजे एनजिंगा आफ्रिकेच्या लोकप्रिय महिलांपैकी एक आहे.

राणी एनगोला

एनजिंगा, एमबांदू लोकांची नेता, दक्षिण पश्‍चिम आफ्रिकन देश एनदोंगो आणि मतांबाची राणी होती. पण एनजिंगाला किमबांदू या स्थानिक भाषेत एनगोला म्हणतात. हा शब्द होता जो पोर्तुगीज लोक या प्रदेशाला ओळखतात. अखेर हा प्रदेश अंगोला म्हणून ओळखला जाऊ लागला. या क्षेत्राला हे नाव तेव्हा पडले जेव्हा पोर्तुगीज सैनिकांनी सोन्या-चांदीच्या शोधात एनदोंगोवर हल्ला केला होता. परंतु जेव्हा त्यांना सोन्या-चांदीच्या खाणी सापडल्या नाहीत तेव्हा त्यांनी ब्राझीलमधील आपल्या नव्या वसाहतीत मजुरांसह व्यापार सुरू केला. एनजिंगाचा जन्म पोर्तुगीजांच्या हल्ल्याच्या आठ वर्षांनंतर झाला आणि तिने तिचे वडील राजा एमबांदी किलुंजी यांच्याबरोबर लहानपणापासूनच आक्रमणकारांशी युद्ध केले.

1617 मध्ये जेव्हा राजा एमबांदी किलुंजी यांचे निधन झाले, तेव्हा त्यांचा एक मुलगा एनगोला एमबांदी याने सत्ता सांभाळली. परंतु त्याच्याकडे वडिलांचा करिश्‍मा नव्हता आणि बहीण एनजिंगाएवढी बुद्धिमत्ता नव्हती. एनजिंगाच्या वतीने आपले स्वत:चे लोक आपल्याविरुद्ध कट रचत आहेत, अशी भीती एनगोला एमबांदीला वाटू लागली. आणि या भीतीमुळे एनगोला एमबांदीने एनजिंगाच्या मुलाला फाशीची शिक्षा जाहीर केली. परंतु नवीन राजा युरोपियन आक्रमणकर्त्यांचा सामना करण्यास असमर्थ ठरला होता, जेव्हा की आक्रमणकर्ते मोठ्या प्रमाणात जीवितहानी करत होते.

पोर्तुगाल विरुद्ध करारांचे राजकारण

यानंतर राजा एनगोला एमबांदीने आपल्या बहिणीबरोबर सत्ता वाटणीचा निर्णय घेतला. पोर्तुगीज मिशनऱ्यांकडून पोर्तुगीज भाषा शिकणारी एनजिंगा एक अतिशय हुशार रणनीतिकार होती. अशा परिस्थितीत एनजिंगा चर्चेची फेरी सुरू करण्यासाठी लुआंडा येथे पोचली, तेव्हा तिने तेथे काळे, गोरे आणि अनेक संकरित जातींचे लोक पाहिले. एनजिंगाने प्रथमच असे दृश्‍य पाहिले होते, परंतु त्याऐवजी काहीतरी वेगळे पाहून तिला आश्‍चर्य वाटले. तेथे प्रत्यक्षात गुलामांना एका रांगेत उभे करून मोठ्या जहाजांमध्ये नेले जात होते. काही वर्षांतच लुआंडा आफ्रिकेतील सर्वांत मोठा गुलामांचा अड्डा बनला.

परंतु, जेव्हा ती पोर्तुगीज राज्यपाल जोआओ कोरिए डे सोउसा यांच्याशी शांततेबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेली, तेव्हा एनजिंगाबरोबर जो व्यवहार केला गेला, त्याबद्दल इतिहासकारांनी भाष्य केले. कारण, जेव्हा ती तेथे पोचली तेव्हा तिने पाहिले, की पोर्तुगीज आरामदायक खुर्च्यांवर बसले आहेत आणि तिच्यासाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था केली गेली होती. हे पाहून एनजिंगा एक शब्दसुद्धा न बोलता उभी राहिली आणि तिच्या नजरेचा हावभाव पाहून एक सेवक खुर्चीच्या शैलीत एनजिंगासमोर बसला. मग एनजिंगा त्याच्या पाठीवर बसली आणि ती राज्यपालांच्या समान उंचीवर पोचली. तेव्हा एनजिंगाने सांगितले, की ती बरोबरीने वाटाघाटी करण्यास आली आहे.

बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी पोर्तुगीज सैन्य एनदोंगो सोडून त्यांचे सार्वभौमत्व स्वीकारेल यावर एकमत झाले. पण त्या बदल्यात एनजिंगाने हे क्षेत्र व्यापाराच्या मार्गासाठी मोकळे सोडले जाईल, यावर सहमती दर्शविली. पोर्तुगालशी संबंध सुधारण्यासाठी एनजिंगाने ख्रिश्‍चन धर्मही स्वीकारला, त्यानंतर तिने ऍना डिसूझा हे नवीन नाव स्वीकारले. त्या वेळी ती 40 वर्षांची होती. पण दोघांमधील चांगले संबंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि लवकरच संघर्ष सुरू झाला.

जेव्हा एनजिंगा राणी बनली...

1624 मध्ये तिचा भाऊ एका छोट्या बेटावर राहू लागला. यानंतर तो तेथेच मरण पावला. एनजिंगाच्या भावाच्या मृत्यूबद्दल अनेक कथा आहेत. काहीजण म्हणतात, की एनजिंगाने मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याला विष दिले. त्याचबरोबर काही लोक त्याच्या मृत्यूकडे आत्महत्या म्हणूनही पाहतात. परंतु, या सर्वांच्या दरम्यान एनजिंगा एमबांदेने पोर्तुगीज आणि तिच्या स्वतःच्या काही लोकांच्या आव्हानांचा सामना करत एनदोंगोची पहिली राणी होण्याचा विक्रम रचला.

अंगोलाच्या नॅशनल लायब्ररीचे डायरेक्‍टर, जाओ पेड्रो लॉरेंको यांच्या म्हणण्यानुसार, एनजिंगा एमबांदे ही आफ्रिकेतील महिलांच्या शोषणाविरुद्ध एक आवाज आहे. ते म्हणतात, "तिच्यासारखे आणखीही अनेक नामांकित सेलिब्रिटी आहेत जे आफ्रिकेत सत्ता स्थापनेत फिट असूनही या महिलेने खंडाच्या विकासात आपले योगदान दिले आहे.'

काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एनजिंगाची शैली एका राणीपेक्षाही क्रूर होती. उदाहरणार्थ, प्रतिस्पर्ध्यांना धमकावून तिची स्थिती मजबूत करण्यासाठी राज्याच्या सीमेवर राहणाऱ्या इमबांगाला योद्‌ध्यांची मदत घेणे. कित्येक वर्षे आपल्या राज्याचे नेतृत्व केल्यानंतर एनजिंगाने शेजारच्या मुतांबा या राज्याचा ताबा घेतला. यासह तिने आपल्या सीमांचेही एक प्रकारे संरक्षण केले.

ब्राझिलियन आणि पोर्तुगीज लेखिका जोस एडुआर्डो अगुआलुसा म्हणतात, "क्वीन एनजिंगा केवळ रणांगणावरील एक महान योद्धाच नव्हे, तर एक महान रणनीतिकार आणि मुत्सद्दी होती. तिने पोर्तुगीज विरुद्ध लढाई केली आणि डचशी मैत्री केली. त्याच वेळी जेव्हा इतर राज्यांशी संघर्ष चालू होता तेव्हा तिने पोर्तुगीजांची मदत घेतली.'

लैंगिक गुलामांशी संबंधित गोष्टी

इटालियन मिशनरी गिओवनी कावेजी यांच्या कथांवर आधारित फ्रेंच तत्त्ववेत्ता मार्किस दे सादे यांनी "द फिलॉसॉफी ऑफ ड्रेसिंग टेबल' हे पुस्तक लिहिले आहे. कावेजीने असा दावा केला, की एनजिंगा ही तिच्या प्रियकरांसोबत लैंगिक संबंधानंतर त्यांना जाळून टाकायची. क्वीन एनजिंगाच्या हॅरेमला चिबडोस असे म्हणतात. आणि तेथे राहणाऱ्या पुरुषांना स्त्रियांचे कपडे घालायला दिले जायचे. एवढेच नव्हे, तर जेव्हा राणीला तिच्या हॅरेममध्ये उपस्थित असलेल्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवायचे असते, तेव्हा हॅरेमच्या मुलांना मृत्यू येईपर्यंत आपापसांत संघर्ष करावा लागत असे. पण विजेत्याला जे मिळेल ते आणखी धोकादायक होते. वास्तविक असे होते, की लैंगिक संबंधानंतर या माणसांना जिवे मारण्यात आले. तथापि, असे मानले जाते की, कावेजीच्या कथा इतर लोकांच्या दाव्यावर आधारित आहेत.

go to top