

AI Financial Planning Apps
esakal
शौनक माईणकर - shaunakmainkar@gmail.com
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ची. याचा वापर करून अनेक कामे सहजसुलभ झाली आहेत. यापैकी अनेकांचे नावडते आर्थिक नियोजनाचे कामही सोपे झाले आहे. बजेट ठरवणं, खर्च लक्षात ठेवणं, बिलं वेळेवर भरणं हे सर्व आता ‘एआय’च्या मदतीने खूप सोपं झालं आहे. मोबाईलवर एक ॲप डाउनलोड केलं, की खर्चाचा हिशेब आपोआप लागतो आणि कुठे जास्त खर्च होतोय याचा अंदाजही मिळतो. अशाच काही उपयुक्त ‘एआय’ ॲपची माहिती.
अनेकदा महिन्याला आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर किती खर्च करतो, हे अनेकांना माहित नसते. अशा वेळी बँक व्यवहार आपोआप वाचून त्याचं वर्गीकरण करणारी टूल्स, ॲप कामाला येतात. उदा. रॉकेटमनी (Rocket Money) हे टूल तुमचे व्यवहार तपासून सांगते, की तुम्ही कोणकोणत्या ओटीटी सबस्क्रिप्शन्ससाठी पैसे देत आहात, आणि त्यातली कोणती तुम्ही वापरत नाही. एका सर्वेक्षणानुसार, बऱ्याच लोकांना आपण कोणते ओटीटी सबस्क्रिप्शन अजूनही चालू ठेवले आहे, हेच माहीत नसते. हे टूल ते शोधून एका क्लिकवर बंद करण्याची सोय देते, तर पॉकेटगार्ड (PocketGuard) ॲप हे तुमचे उत्पन्न, ठरलेली बिले आणि बचतीचे उद्दिष्ट लक्षात घेऊन ‘खर्च करण्यासाठी किती रक्कम आहे’ हे सांगते. म्हणजे पगार आला, की लगेच शॉपिंगला जाण्याआधी, आधी बिले आणि बचत बाजूला ठेवून उरलेली रक्कम किती, हे एका नजरेत कळते.