Premium|AI Geopolitics : एआयवरील नियंत्रणासाठी अमेरिका-चीनमध्ये वर्चस्वाची लढाई; भारतासमोर स्वतंत्र तंत्रज्ञान व्यवस्था उभारण्याचे आव्हान

AI Geopolitics and Global Technology Rivalry : कृत्रिम बुद्धिमत्तेवरील नियंत्रणासाठी अमेरिका-चीनमधील स्पर्धा, संगणकीय क्षमता व गुंतवणुकीतील असमानता, तंत्रज्ञानाचे निर्यात निर्बंध आणि या परिस्थितीत भारतासमोरील डिजिटल सार्वभौमत्वाचे आव्हान.
AI Geopolitics and Global Technology Rivalry

AI Geopolitics and Global Technology Rivalry

esakal

Updated on: 

समीर पाटील - sameer.patil@orfonline.org

एआयने (कृत्रिम बुद्धिमत्ता) संशोधन प्रयोगशाळेपासून उद्योग, व्यापार आणि संरक्षण क्षेत्रापर्यंत अल्पावधीत मोठी मजल मारली आहे. त्यामुळे एआयवरील नियंत्रण ही केवळ तंत्रज्ञानाची नव्हे, तर जागतिक सत्तास्पर्धेची बाब बनली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षामुळे तंत्रज्ञानावरील अवलंबित्व, निर्यात निर्बंध आणि डिजिटल सार्वभौमत्वाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वदेशी क्षमता विकसित करताना जागतिक सहकार्याचे मार्ग खुले ठेवून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

संशोधन प्रयोगशाळेपासून राज्यकारभारापर्यंतचे अंतर ‘एआय’ने (कृत्रिम बुद्धिमत्ता) जितक्या वेगाने कमी केले तितके क्वचितच अन्य कोणत्या तंत्रज्ञानाने केले असेल. अवघ्या पाच वर्षांत एआयने संशोधनाच्या आघाडीवरील तंत्रज्ञानापासून औद्योगिक धोरण, निर्यात नियंत्रण, आघाडी व्यवस्थापन आणि दबावाचे साधन म्हणून स्थान मिळवले आहे. सुरुवातीला एआयच्या मॉडेलची क्षमता किती आहे, हा प्रश्न होता. आता मात्र संगणकीय क्षमतेवर (कॉम्प्युट) कोणाचे नियंत्रण आहे, तंत्रज्ञानाचे मानदंड कोण ठरवते आणि अब्जावधी लोकांच्या आर्थिक व प्रशासकीय जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या प्रणालींमध्ये कोणाची मूल्यव्यवस्था प्रतिबिंबित होते, हे महत्त्वाचे आहेत.

हा बदल इतक्या वेगाने झाला आहे, की आपली धोरणे आणि नियम अद्यापि त्यानुसार अद्ययावत झालेले नाहीत. आजही ‘एआय’कडे व्यापाराच्या नेहमीच्या नियमांच्या अधीन असलेले एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून पाहिले जाते. मात्र ते तसे राहिलेले नाही. व्यावसायिक आणि लष्करी तंत्रज्ञानातील सीमारेषाच आता पुसट झाली आहे. भाषेचे मॉडेल प्रशिक्षित करणारा ग्राफिक्स प्रोसेसर लष्करासाठी लक्ष्य निश्चित करणारे अल्गोरिदमही चालवू शकतो. तसेच वितरणासाठीच्या ड्रोनला उडविणारे स्वयंचलित नियंत्रण तंत्र शत्रूच्या लक्ष्यावर मारा करणाऱ्या भटक्या शस्त्रास्त्रालाही नियंत्रित करू शकते. त्यामुळे एआयचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी देशांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेण्यापासून रोखण्यासाठी निर्यात नियंत्रण, गुंतवणुकीची छाननी आणि तंत्रज्ञानाचे मानदंड निश्चित करणे, ही आता राज्यकारभाराची साधने बनत आहेत. या बदलाच्या तीन परस्परांशी जोडलेल्या पैलूंचा या लेखात ऊहापोह करण्यात आला आहे.

पहिला पैलू म्हणजे परिवर्तन घडवून आणणारे तंत्रज्ञान म्हणून एआय आणि त्याच्या प्रसारातून निर्माण झालेली संरचनात्मक असमानता होय. दुसरा म्हणजे प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेली एआयमधील वर्चस्वाची भूराजकीय स्पर्धा आणि त्यातून अधिकाधिक परस्परविरोधी होत जाणाऱ्या दोन तंत्रज्ञान व्यवस्थांचा उदय. तिसरा पैलू म्हणजे या स्पर्धात्मक वातावरणात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. आघाडीच्या एआय मॉडेल्सच्या विकासात भारत, अमेरिका किंवा चीनसारखा थेट प्रतिस्पर्धी नाही आणि केवळ तंत्रज्ञानाचा निष्क्रिय ग्राहकही नाही. त्याऐवजी भारत मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर करणारा देश, विविध उपयोगांची चाचणी घेणारी प्रयोगशाळा आणि ग्लोबल साऊथच्या देशांना एकत्र आणणारा संभाव्य समन्वयक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करू पाहत आहे.

परिवर्तन घडविणारे, पण असमान एआय तंत्रज्ञान

एआय ज्या वेगाने आणि ज्या व्यापक प्रमाणात प्रगती करत आहे, त्याची पाच वर्षांपूर्वी कल्पनाही करणे कठीण होते. माणसासारखा मजकूर, संगणकीय कोड आणि चित्रे तयार करू शकणाऱ्या मोठ्या भाषिक मॉडेल्सच्या आगमनासोबतच एजंटिक एआयचा झपाट्याने झालेला विकास यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. जनरेटिव्ह एआय आणि एआयवर आधारित साधनांचा वापर आरोग्यसेवा, सर्जनशील अर्थव्यवस्था, उत्पादन, उद्योगांचे दैनंदिन कामकाज, वित्तीय तंत्रज्ञान आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत वेगाने वाढत आहे. निर्णयक्षमता, विश्लेषण, कार्यक्षमता आणि नवोन्मेष या क्षेत्रांत त्याचे ठळक फायदे दिसून येत आहेत. गुगलच्या मासिक ‘इन्फरन्स’ वापराचे प्रमाण वर्षभरात सुमारे ५० पटींनी वाढले आहे. यावरून एआयचा वापर केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामकाजाचा अविभाज्य भाग बनत असल्याचे स्पष्ट होते. अत्याधुनिक एआय मॉडेल्सची क्षमता त्यांचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या संस्थांच्या क्षमतेपेक्षा अधिक वेगाने पुढे जात आहे. पूर्वीच्या सर्वसाधारण वापरातील तंत्रज्ञानापेक्षा एआयचे वेगळेपण म्हणजे त्याच्या क्षमतेचा प्रसार होण्यापेक्षा त्याचा वापर अधिक वेगाने सर्वदूर पोहोचत आहे. यंत्रे भाड्याने घेता येतात, एआय मॉडेल्स उपलब्ध करून देता येतात; मात्र सेमीकंडक्टर निर्मितीचा कारखाना आणि डेटा सेंटर सहज उपलब्ध करून देता येत नाही.

तीन संरचनात्मक असमानता

पहिली असमानता : संगणकीय क्षमता व भांडवलातील दरी

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा भांडवली खर्च २०२५मध्ये ४०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाला, तर चीनमध्ये तो सुमारे ६३ अब्ज डॉलर होता. २०२६मध्ये अमेरिकेतील हा खर्च ८०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. २०२५मध्ये अमेरिकेतील खासगी एआय गुंतवणूक २८५.९ अब्ज डॉलर होती. ही चीनमधील १२.४ अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या २३ पटींपेक्षा अधिक आहे. ग्लोबल साऊथमधील बहुतांश अर्थव्यवस्थांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही शंभर पटींहून अधिक आहे. एआय क्षेत्रातील जोखीम भांडवली गुंतवणूकही काही मोजक्या देशांमध्ये केंद्रित आहे. २०२५मध्ये जागतिक एआय क्षेत्रातील अशा गुंतवणुकीच्या सुमारे ७५ टक्के व्यवहारमूल्य अमेरिकेतील कंपन्यांनी मिळवले, तर युरोपीय संघाचा वाटा सहा टक्के होता. अमेरिकेत ५,४०० हून अधिक डेटा सेंटर आहेत. ही संख्या अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत दहापटीपेक्षा अधिक आहे. याउलट आफ्रिकेतील बहुतांश देश, लॅटिन अमेरिकेचा मोठा भाग तसेच दक्षिण आणि आग्नेय आशियातील अनेक देश या संसाधनांच्या अत्यल्प वाट्यासाठी स्पर्धा करीत आहेत. एआयच्या संपूर्ण तंत्रज्ञान-साखळीतील चिप्स, डेटा सेंटर, क्लाउड, मॉडेल्स आणि वितरण व्यवस्था प्रत्येक स्तरावर काही मोजक्याच कंपन्यांचे नियंत्रण आहे. अमेरिकेतील केवळ चार कंपन्या मेटा, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि गुगल-अल्फाबेट २०३० अखेरपर्यंत एकत्रितपणे ५.३० ट्रिलियन डॉलर खर्च करतील, असा अंदाज आहे. ही रक्कम सध्याच्या जपानच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षाही अधिक आहे. या स्थितीमुळे जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांसाठी प्रवेशाच्या अटी, किंमत ठरविण्याची पद्धत आणि वापराच्या अटी निश्चित करण्याची क्षमता या कंपन्यांकडे येते.

दुसरी असमानता : संशोधनाची संख्या अधिक असणे म्हणजे त्या संशोधनाचे प्रत्यक्ष वापरता येण्याजोग्या तंत्रज्ञानात रूपांतर होईलच असे नाही. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या आकडेवारीनुसार, ब्रिक्स देशांमध्ये २०२३-२४ या कालावधीत चीनमध्ये एआयशी संबंधित ५२,१७५ पेटंट अर्ज प्रकाशित झाले. त्या तुलनेत भारतात २९६, तर रशियात केवळ ३४ पेटंट अर्ज प्रकाशित झाले. चीनच्या तुलनेत भारताचे प्रमाण सुमारे १७६ : १, तर ब्राझीलच्या तुलनेत सुमारे २,००७ : १ आहे. भारतामध्ये स्कोपस निर्देशित एआय संशोधनाची ४३ हजारांहून अधिक कागदपत्रे प्रकाशित झाली आहेत. ब्रिक्स देशांमध्ये चीनच्या सुमारे ६१ हजार कागदपत्रांनंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र, या संशोधनातील अत्यल्प भागाचे पेटंट किंवा व्यावसायिक उत्पादनात रूपांतर होते. त्यामुळे अडथळा ज्ञाननिर्मितीचा नसून संशोधनाचे उत्पादनात रूपांतर करणारी संस्थात्मक आणि आर्थिक यंत्रणा उभारण्याचा आहे.

तिसरी असमानता : प्रबळ एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जाणारा डेटा ज्या लोकसंख्येसाठी ही मॉडेल्स वापरली जाणार आहेत, तिचे पुरेसे प्रतिनिधित्व करणारा किंवा वैविध्यपूर्ण नसतो. त्यामुळे जगातील बहुतांश लोकांच्या भाषिक आणि सामाजिक-सांस्कृतिक वास्तवात या मॉडेल्सचा वापर केल्यास अल्गोरिदममधील पूर्वग्रह, असमान कामगिरी आणि व्यवस्थात्मक भेदभाव निर्माण होऊ शकतो. यातून दुहेरी अन्यायाची परिस्थिती निर्माण होते. ज्या लोकसंख्येच्या डेटाचा आणि डिजिटल संसाधनांचा वापर केला जातो, त्याच लोकसंख्येला त्यातून मिळणाऱ्या फायद्यांपासून दूर ठेवले जाते आणि त्याच वेळी एआयमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करावा लागतो.

Loading content, please wait...