

AI Investment Slowdown
esakal
जागतिक शेअर बाजारात गेली दोन वर्षे गुंतवणुकीचा मोठा हिस्सा अमेरिकेतील ‘एआय’शी संबंधित कंपन्या, चिपनिर्मिती, डेटा सेंटर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळला होता. परिणामी भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांकडे परदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी झाला होता. मात्र नोव्हेंबर २०२६ मध्ये या चित्राला अनपेक्षित कलाटणी मिळाली. याची कारणे, भारताला झालेला फायदा व भविष्याविषयी...
अमेरिकेतील एआय कंपन्यांच्या प्रचंड भांडवली खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळेल का, याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात साशंकता निर्माण झाली. त्यामुळे एआय क्षेत्रातील गुंतवणुकीतून काही प्रमाणात पैसा बाहेर पडू लागला आणि त्यातील काही पैसा भारताकडे वळल्याचे चित्र नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळाले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक स्वरूपात दिसून आला. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय/एफपीआय) भारतीय शेअर बाजारात सुमारे १०.६ अब्ज डॉलर म्हणजेच १.०१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एका महिन्यातील परदेशी गुंतवणुकीचा हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा ठरला. डिसेंबर २०२० मध्ये नोंदवलेला ८.४ अब्ज डॉलरचा विक्रमही यामुळे मोडला गेला. विशेष म्हणजे, जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे २.९५ लाख कोटी रुपये काढून घेतले होते. त्यामुळे नोव्हेंबरमधील ही गुंतवणूक म्हणजे केवळ हळूहळू परत येण्याची प्रक्रिया नसून, त्यांच्या गुंतवणूक धोरणातील मोठा बदल असल्याचे दिसते.
भारत वगळता इतर सात प्रमुख आशियायी बाजारपेठांमधून याच काळात एकत्रितपणे २२.६ अब्ज डॉलरचा निधी बाहेर गेला. अशा प्रतिकूल जागतिक वातावरणात भारताने मात्र १०.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली. त्यामुळे भारताची ही कामगिरी निश्चितच विशेष ठरते.