

AI in School Education and Child Development
esakal
वैशाली मंडपे - sakal.avtaran@gmail.com
जेव्हा एखादे मूल डिजिटल उपकरणाचा वापर करते, तेव्हा त्याची संपूर्ण माहिती विविध प्लॅटफॉर्मवरून गोळा केली जाते. अनावधानाने मुलं आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. अवैध काम करणारी लोकं अशा सॉप्ट टार्गेटच्या शोधात सक्रिय असतात..
शालेय शिक्षणात एआयचा वापर अंतर्भूत करण्यात आला. शिक्षकांना ट्रेनिंग दिले गेले. काळाबरोबर आधुनिक तंत्रज्ञान माहिती असणे गरजेचे आहे. जगभरातील ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध असल्यामुळे मुले अधिक जागरूक आणि माहितीपूर्ण बनू शकतात; पण ‘योग्य वयात’ हे जास्त महत्त्वाचे. चॅट जीपीटी वापरून होमवर्क, शालेय प्रोजेक्ट झटपट एका क्लिकवर करून उरलेल्या भरपूर वेळात ही मुलं काय करतात? शालेय वयात मुलांना पुस्तकांच सखोल वाचन करणं, क्रिटिकल थिंकिंग यासाठी सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. मात्र, सततच्या डिजिटल माऱ्यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता मंदावते.
कोविड काळात मुळातच मुलांमधील डिजिटल ॲडिक्शन वाढलंय. त्याचबरोबर गेमिंग आणि त्यातूनच मुलांना लागलेली गॅम्बलिंगची सवय. या इझी मनीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या व्यसनातही भर पडली आहे. शिक्षण, करिअर यापेक्षा रील बनवणे, गेम खेळणे, ट्रेडिंग करणे याकडे मुलांचा कल जास्त प्रमाणात वाढला आहे.