AI smart glasses
Esakal
ब्रिजेश सिंह
तुम्ही पुस्तकांच्या दुकानात आहात आणि समोरच्या एका मुखपृष्ठाकडे पाहता. तुम्ही सहज विचारता, ‘हे पुस्तक कशाबद्दल आहे?’ काही सेकंदांत तुमचा चष्मा त्याचे उत्तर देतो. त्या क्षणी तुम्हाला मुखपृष्ठ वाचायची गरजही भासत नाही. हा चमत्कार शक्य होतो; कारण तुमचा चष्मा त्या पुस्तकाचा क्षणिक फोटो क्लाउड सर्व्हरवर पाठवतो, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचं विश्लेषण करते...
आता चष्मा फक्त पाहण्यासाठी नाही; तर विचार करण्यासाठीही तयार झाला आहे. डोळ्यांसमोर तरळणारं जग अचानक अर्थपूर्ण होतंय - रस्त्यावरील परदेशी फलक तुमच्या भाषेत वाचला जातो, गर्दीत एखाद्या ओळखीच्या चेहऱ्यावर तुमच्या आठवणी उजळतात आणि काळजी करू नका, हरवलेली गाडी कुठे आहे हेही सांगणारा तोच चष्मा. ही जादू नाही; तर बुद्धिमत्तेचा नवा आकार आहे - ‘एआय स्मार्ट ग्लासेस’. साध्या काचेच्या आत आत एक सूक्ष्म मेंदू दडला आहे, जो तुमच्यासोबत पाहतो, ऐकतो, समजतो आणि प्रतिसाद देतो. विज्ञान कल्पनेच्या पडद्यावरून उतरून, ही तंत्रज्ञान क्रांती आपल्या दैनंदिन जगण्यात एक नव्या नजरेचा अनुभव घडवते आहे.