
कृत्रिम बुद्धिमत्तेने दोन हजार वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडले आहे. खाक झालेल्या ग्रंथांमधून इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे शक्य झाले आहे. निसर्गाच्या विनाशकारी प्रकोपात नष्ट झालेलं ज्ञान आज विज्ञानाच्या मदतीने पुन्हा जिवंत झालं आहे. एआय केवळ भविष्य घडवण्यासाठीच नाही, तर आपल्या भूतकाळातील रहस्यं उलगडण्यासाठीही एक शक्तिशाली, जादुई साधन आहे.
मित्रांनो, जरा डोळे मिटून कल्पना करा! तुम्ही एका अद्भुत, रहस्यमय ग्रंथालयात उभे आहात. आजूबाजूला हजारो वर्षांपूर्वीची, धूळ साचलेली; पण तितकीच मौल्यवान पुस्तकं! प्रत्येक पुस्तकात दडलेला आहे, इतिहासाचा एक अनमोल ठेवा. पण, एक भयंकर अडचण आहे... तुम्ही त्यातलं एकही पुस्तक उघडू शकत नाही, कारण त्याला स्पर्श जरी केला तरी ते जळून राख होईल! किती निराशाजनक आहे ना? शतकानुशतके ज्ञानाचा एवढा मोठा खजिना तुमच्या डोळ्यासमोर असूनही, तुम्ही ते ज्ञान मिळवू शकत नाही.