

Ajit Pawar Political Career
sakal
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धडाडीचे, रोखठोक आणि विकासकामांवर भर देणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांनी स्वतःचा ‘ब्रँड’ तयार केला होता. त्यांच्या निधनामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव्हे, तर संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही राजकारणातील सारीपाटावर खेळाची नव्याने मांडणी करावी लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे केवळ पवार कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण राज्य दुःखात बुडाले आहे. साखर कारखान्याच्या संचालक पदापासून राजकारणाची सुरुवात करून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती. राजकारणाचा श्रीगणेशा करताना देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखा काका आणि पाठीराखा असणे ही जमेची बाजू असली, तरी वटवृक्षाच्या सावलीत स्वतःचे मोठेपण सिद्ध करणे अवघड असते. तरीही तीन दशकांहून अधिक काळात अजित पवारांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख आणि ‘ब्रँड’ उभा केला. कुशल प्रशासक, चतुर रणनीतिकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या कट्टर विरोधकांनीही ही वैशिष्ट्ये जाहीरपणे मान्य केली होती. त्यामुळेच, सर्व राजकीय चढउतारांनंतरही ते डगमगले नाहीत आणि सदैव जनतेच्या प्रेमाला पात्र ठरले, ही त्यांच्या कार्याची फलश्रुती आहे.