
लष्करी इतिहासातल्या काही लढाया भूभागावरून ओळखल्या जातात, तर काही मात्र आपल्या प्राणासह सर्वस्व समर्पित करणाऱ्या वीरांच्या नावाने अमर होतात! ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्राचं मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या या लढाया म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी स्फूर्तीचा अखंड स्रोतच! १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातली गंगासागरची लढाई अशाच एका वीर योद्ध्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. हा परमवीर म्हणजे लान्सनायक अल्बर्ट एक्का!
पेटलेला ईशान्य
१९७१ चं वर्ष! ईशान्येकडे फोफावणाऱ्या दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय सैन्याच्या अनेक मोहिमा आकार घेऊ लागल्या. प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटलं. या युद्धादरम्यान १४ गार्ड्स बटालियनला एक अत्यंत महत्त्वाचं कार्य सोपवण्यात आलं. ते म्हणजे - गंगासागर येथील शत्रूच्या मजबूत तटबंदी असलेल्या चौकीवर ताबा मिळवणं. ही चौकी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील (आता बांग्लादेश) ब्राह्मणबारिया जिल्ह्यात अगरताळपासून ६ किलोमीटर दूर पश्चिमेला होती. ढाक्याला जोडणाऱ्या एका प्रमुख रेल्वेमार्गावर असलेल्या या शत्रूच्या ठिकाणाला सामरिक दृष्टीने खूप महत्त्व होतं. ९ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला अल्बर्ट तिथे सज्ज झाला!