
सुनील चावके
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार सध्या गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतदारयाद्यांच्या बेरीज-वजाबाक्यांच्या खेळात एकमेकांना आव्हाने देत, परस्पर कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत.
ज्ञानेशकुमार यांना बळ लाभले आहे ते केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि २०२३ साली संसदेने संमत केलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य आयुक्तांच्या कायद्याचे. राहुल गांधी यांना बळ लाभू पाहात आहे ते जनतेच्या न्यायालयाचे. कालांतराने ज्ञानेशकुमार यांना कायद्याने लाभलेल्या अधिकारांना मर्यादा येऊन या खेळाला भाजप विरुद्ध काँग्रेसप्रणित ‘इंडिया आघाडी’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे राजकीय युद्धाचे स्वरूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.