
Amitabh Bachchan
esakal
जी. बी. देशमुख
अमिताभ ११ ऑक्टोबरला ८३ वर्षांचा होणार. सध्या केबीसीचा सतरावा हंगाम सुरू आहे. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केल्यापासून गेले तीन हंगाम अमिताभ केबीसीमध्ये प्रत्येक भागात प्रवेश करताना धावत येत असतो. वयाच्या नवव्या दशकात त्याचा धावण्याचा ढंग वय दाखवत असला, तरी त्याचे चाहते मात्र त्याने तरुण वयात अनेक सिनेमांत, अनेक प्रसंगांत वठवलेलं रोमांचकारी धावणं आठवत असतात.
अमिताभचा वेडा चाहता असलेला आमचा एक मित्र शाळकरी जीवनापासूनच एका गोष्टीवर ठाम असायचा, की सूट घालावा तर अमिताभने, पडद्यावर दारू प्यावी ती अमिताभने आणि जीवाच्या आकांतानं पडद्यावर धावावं, तेदेखील अमिताभनेच. अमिताभच्या अदाकारीच्या एका एका पैलूवर पानंची पानं खर्ची पडतील. आज आपण अमिताभनं पडद्यावर लगावलेल्या अशाच निवडक धावांची चर्चा करू या.
अमिताभ त्याच्या कारकीर्दीत अनेक अटीतटीच्या प्रसंगात पडद्यावर धावला आहे. पडद्यावरची अमिताभची धावण्याची लकब बघण्यातसुद्धा एक वेगळीच गंमत असते. चित्रपटातील वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचं धावणं प्रत्येक वेळेला नवीन अर्थ देऊन जात असतं. ‘दीवार’मध्ये शेवटच्या प्रसंगात इन्स्पेक्टर असलेला भाऊ शशी कपूर रिव्हॉल्व्हर रोखून थांबण्याचं आवाहन करीत असताना चर्चगेटच्या रिकाम्या फुटपाथवरून आईला भेटायच्या ओढीनं धावणारा विजय, ‘शोले’मध्ये गब्बरची माणसं पाठीमागून बंदुकीच्या गोळ्या डागत असताना लाकडी पुलावरून धावणारा जय, ‘शक्ती’मधील शेवटच्या प्रसंगात बापाच्या भूमिकेतील पोलिस अधिकारी दिलीपकुमार रिव्हॉल्व्हर रोखून थांबण्याचं आवाहन करीत असताना विमान-धावपट्टीच्या परिसरात धावणारा विजय किंवा ‘डॉन’ सिनेमात पोलिसांचा ससेमिरा चुकवत मुंबईच्या धोबीघाटातून धावणारा ‘तोतया डॉन’ विजय. प्रत्येक वेळी वेगळाच रोमांच आणि दमदार ॲक्शन! त्याची अशीच वैविध्यपूर्ण धाव ‘काला पत्थर’, ‘मिस्टर नटवरलाल’ इत्यादी सिनेमांतसुद्धा होती; पण त्यानं ‘अंधा कानून’मध्ये घेतलेली एक धाव भयंकर होती, जीवघेणी होती.