
डॉ. श्रीकांत कार्लेकर
गेल्या चार हजार वर्षांतल्या समुद्रपातळीच्या हालचालींमुळे अश्मिभूत पुळणी तयार झालेल्या असल्यामुळे त्यावेळी कोकण किनाऱ्याची धाटणी किंवा ठेवण कशी होती हे समजण्यासाठी त्यांचे नेमके स्थान कळणे आवश्यक असते. सध्या जगभरात सुरू असलेल्या समुद्रपातळीच्या वाढीच्या संदर्भात भविष्यात आजच्या कोकणातील खाड्या, वस्त्या, पुळणी यांचे भवितव्य काय असेल, हे समजण्यासाठी या संशोधनाचा खूपच फायदा होऊ शकतो.
गेल्या हजारो वर्षांत निसर्गात झालेल्या बदलांचे पुरावे निसर्गानेच सर्वत्र सांभाळून ठेवले आहेत. आपल्याला ते सहजपणे दिसत नाहीत किंवा त्यांचे आकलन होत नाही. पण जेव्हा दिसतात, कळतात तेव्हा निसर्गाच्या ताकदीचा आणि त्यात सातत्याने होत राहणाऱ्या बदलांचा आवाका लक्षात येतो. अशा बदलांचा पाठपुरावा केला, की मग पृथ्वीची न उलगडलेली किंवा न उमगलेली वैशिष्ट्ये दिसू लागतात.