

The Art of Anju Dodiya
esakal
हर्ष भटकळ
लहानपणी ही मुलगी चित्रकार होईल असे कुणी सांगितले असते तरी त्यावेळी ते कुणाला खरे वाटले नसते, अंजू दोडिया चित्र काढतात ते बाह्यजगाला दाखवण्यासाठी नाही तर त्यांची कल्पनाशक्ती स्मरणगंध, भावनाविश्व यांच्याशी नाट्यपूर्ण संवाद त्या साधत असतात. त्यांचे प्रत्येक पेंटिंग हा मनाचा गाभा शोधण्याचा प्रयत्न असतो.
अंजू दोडिया यांच्यासाठी कलाजगत हे आत्मरूपही नाही किंवा चित्ररूपही नाही. जणू त्यांच्या मनाच्या रंगमंचावर कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती आणि भावना एकत्र येऊन निरनिराळे आकार घेत असतात. देशातल्या आजच्या सर्वोत्कृष्ट कलावंतामध्ये अंजू दोडिया यांना विशेष स्थान आहे. त्यांच्या कलाकृती देशविदेशातील अग्रगण्य संग्रहालयात प्रदर्शित झाल्या आहेत. मात्र आपल्या यशाबद्दल बोलताना त्यांना काहीसा संकोच वाटतो. फक्त त्या आपल्या पेंटिंगबद्दल बोलतात तेव्हा मात्र त्यांना आवाज फुटतो. अंजू दोडिया यांच्या लेखी कीर्तीला महत्त्व नाही. त्यांना रस आहे ती आपली नजर वृद्धींगत करण्यात.