
रोमन इतिहासात आपले धैर्य आणि बंडखोरीच्या जोरावर नाव कोरणारा क्लॉडियस सिबलीस आपल्याला माहीत असेलच. सिबलीस रोमन सैन्यात अधिकारी होता. त्याच्यावर सैन्यदलाकडून अन्याय झाला आणि त्याने बंड पुकारले. तो ज्या बॅटावियन समाजाचे प्रतिनिधित्व करीत होता त्याच नावाने त्याचे बंड ओळखले जाते. त्याने आपल्या जमातीसोबत रोमविरुद्ध उठाव केला. त्याला स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते. त्याच्या मते धैर्य हा माणसाचा एक महत्त्वाचा गुण आहे. माणूस धैर्यशील आहे... पण खरेच तसे आहे का? वाघाच्या तावडीतून आपल्या पिल्लांना वाचवताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहणाऱ्या हरणात नसते का धैर्य...?
माणूस नेमका कोण आहे, त्याच्या जन्माचे गूढ काय, उद्देश्य काय, याबाबत अजूनही कुणीही ठामपणे काही सांगू शकलेले नाही. तरीही मानवाने आपल्या प्रगतीच्या कक्षा रुंदावतानाच स्वतःच्या जगण्याचे कोडे उलगडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्याच्या मनात कोंडलेल्या कुतूहलातून अनेक प्रश्नांनी जन्म घेतला. कितीतरी विद्वानांनी या प्रश्नाच्या महासागरात खोलवर उडी घेतली, गटांगळ्या खाल्ल्या. प्रश्नाच्या तळाशी जाऊन अथांग महासागरातून आपल्या हाती लागेल त्या निकषांच्या आधारे त्यांनी माणूस नावाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला.
अगदी डार्विनपासून ते ॲडम स्मिथ, मार्टिन लुथर, ॲरिस्टॉटलपर्यंत अनेकांनी त्यावर आपली मते व्यक्त केली. ही मते त्यांनी केलेल्या प्रयोगांमधून, वस्तुस्थितीदर्शक अवलोकनातून आणि सखोल चिंतनातून आलेली असतील, असे आपण मानायला हरकत नाही; पण तसे असले तरी या विद्वानांच्या चिंतनातूनही माणूस हा नेमका बुद्धीनिष्ठ प्राणी आहे, धार्मिक आहे की सामाजिक, असे प्रश्नच तयार झाले. या प्रश्नाचे नेमके उत्तर मात्र आजही अचूकपणे कुणाला देता आलेले नाही. कदाचित यापुढेही ते मिळवणे तेवढे सोपे नसेल. कारण मानवी शरीर आणि मन अशी मानव संरचनेची दोन मुख्य अंगे आहेत. शारीरिक रचनेचा विचार केला तर माणूस हा प्राणी या संवर्गात वळतो; पण त्याच्या मनाच्या अंगाने विचार करायला गेल्यास अनेक नवी कोडी उपस्थित होतात. ती उलगडणे वाटते तेवढे सोपे नाही.