पुणे: आमोदला एका मोठ्या पोस्टवर नोकरी मिळाली होती. अचानक इतक्या मोठ्या पोस्टवर त्याला नोकरी मिळाल्याचा त्याला आनंद होताच.. पण नवी नोकरी आणि अचानक आलेलं काम याने त्याच्यावर दडपण आलं होतं. त्याला त्या काळात त्याच्याकडून कोणतीही चूक करू द्यायची नव्हती.. पण या दडपणामुळे त्याच्यातला आत्मविश्वास थोडा कमी झाला होता. दरम्यान त्याची बायको देखील त्याच क्षेत्रात काम करणारी होती पण तिने काही काळासाठी ब्रेक घेतल्यामुळे ती घर सांभाळत होती.
सुरुवातीच्या काळात तिने आमोदला त्यांच्या कामात बरीच मदत केली. बऱ्याचश्या गोष्टी या दोघांनी मिळून केल्या. नंतर काही काळ गेल्यावर आमोदला त्याची काही कामे बायकोकडून घ्यायची सवयच लागली. तो त्या कामासाठी तिच्यावर अवलंबून राहू लागला. तर दुसरीकडे बायकोचा देखील त्याच्या कामाच्या अनेक निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढत होता. दोघांसाठी ही धोक्याची घंटा होती.
एक दिवस त्याचा अतिरेक झाला आणि दोघांनाही हे समजून गेलं की, आपण एकमेकांना मदत करायला हवी पण याचा अर्थ आपण एकमेकांवर अवलंबून राहता कामा नये. आपण एकमेकांना आत्मविश्वास नक्की द्यायला हवा पण एकमेकांच्या निर्णयात हस्तक्षेप करता कामा नये.
खूपदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला मदत करायला जातो आणि त्या व्यक्तीवर अवलंबून राहायची आपल्याला सवयच लागते. तर दुसऱ्या बाजूने असं होतं की आपण कोणाकडून तरी मदत घ्यायला जातो आणि कळत नकळतपणे ती व्यक्ती आपल्यावर त्यांचे निर्णय लादायला सुरुवात करते किंवा आपल्या वतीने ती स्वतःच निर्णय घेऊ लागते.