esakal | माय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा
sakal

बोलून बातमी शोधा

माय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा}

माय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता आमच्या पुढील प्रवासाला सुरवात केली. वातावरण खूप शांत, आल्हादायक आणि थंड होते. वाटेत एका लहान कॅन्टीनमध्ये गुजराथी चहाचा आस्वाद घेतला. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर समुद्र खाडीवरील सुरजबरी पुलावर पोहोचलो. येथील वातावरण इतके सुंदर होते की आम्ही या पुलावर काही वेळ घालविला. पाण्यावर वाहणारा वाफेचा थर, धुके, थंडगार हवा, अनेक पक्ष्यांचा किलबिलाट, आकाशातील सुंदर ढग आणि रंगीबेरंगी छटा याचा आम्ही पुरेपूर आनंद लुटला. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुललेली शेती, फळबागा, शेतातील सुंदर घरे आणि निसर्गमय रस्ता ही शेतकऱ्यांची सुबत्ता दर्शवित होती. आम्ही हॉटेल अन्नपूर्णा याठिकाणी गुजराथी पद्धतीचे गरम जिलेबी, गाठी फाफडा ढोकळा, सामोसा याचा स्वाद घेत तेथील आचाऱ्याबरोबर संवाद साधून खाद्य संस्कृतीचा आढावा घेतला.

काही वेळानंतर मांडवी येथील किल्ला पहिला. मांडवीचा किल्ला १५४९ मध्ये रावश्री भारमलजींनी बांधला आहे. या किल्याला पाच दरवाजे, तीन खिडक्‍या आणि सात बुरुज (कोठा) आहेत. कच्छ गुर्जर क्षत्रियांच्या इतिहासानुसार त्यांच्या समाजातील अनेक कुळे, विशेषत: गोहिल, भट्टी, जेठवा, सोळंकी, राठोड कुळ आणि विसावरीया ब्राह्मण धनेतीहून मांडवी येथे स्थलांतरित झाले. या शहराची स्थापना १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात कच्छचे पहिले जडेजा शासक राव खेंगरजी प्रथम यांनी केली.

येथील प्रसिद्ध पर्यटन केंद्र विजय विलास महालाला आम्ही भेट दिली. कच्छचे महाराज श्री खेंगरजी तिसरा यांच्या कारकिर्दीत राजवाड्यातील त्यांचे पुत्र आणि वारसदार युवराज श्री विजयराजी यांना उन्हाळ्यात वापरासाठी हा महाल बांधण्यात आला. हा भव्य महाल इंडो-युरोपियन शैलीमध्ये बांधला गेला आहे. राजवाडा लाल वाळूच्या दगडाने बांधलेला आहे. यात राजपूत वास्तुकलेचे सर्व घटक आहेत आणि मुख्यतः ओरछा आणि दतियाच्या वाड्यांच्या योजनेवर आधारित आहेत. खांबांवरील मध्यवर्ती उंच घुमट, बाजूंना बंगाल घुमट, रंगीत काचेच्या खिडक्‍या, कोरीव दगडी ‘जाली’, कोपऱ्यांवर घुमट बुरुज, विस्तारित पोर्च आणि इतर उत्कृष्ट दगडी कोरीव घटक, हे महल पाहण्यासारखे बनवतात. ग्राउंड फ्लोअरला राजाची बैठक व्यवस्था त्यांच्या डायनिंग हॉल, त्यांचे बेडरूम, गेस्ट रूम, राजांनी शिकार केलेला चित्ता आणि वाघ भुसा घालून ठेवलेला होता.

हेही वाचा: 200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास

पॅलेस इस्टेटमध्ये या राजांचा खासगी मालकीचा समुद्रकिनारा आहे. येथील सुंदर, निसर्गरम्य आणि स्वच्छ बीच पर्यटकांसाठी एक अद्वितीय आकर्षण आहे. पूर्वीचे रजवाडे कुटुंब आता समुद्रकिनाऱ्यावर तंबू असलेल्या रिसॉर्टमध्ये राहण्याची येत असत. रिसॉर्ट पॅलेस इस्टेटमधील स्थान लक्षात घेऊन शाही अतिथी शिबिरासारखे दिसण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. प्रत्येक तंबू खोलीमध्ये ब्रिटिश वसाहती शैलीचे लाकडी फर्निचर, आधुनिक स्नानगृह आणि एक अंगण आहे. समुद्रकिनाऱ्यावरील खाचलेल्या खुल्या बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये समुद्राचे न संपणारे दृश्‍य पाहावयास मिळते आणि बीचवर बार्बेक्‍यूची व्यवस्था केली आहे. इतर बीच सुविधांमध्ये व्हॉलीबॉल कोर्ट, डेक चेअर आणि सावलीत बसण्याची व्यवस्था यांचा समावेश आहे. पर्यटक या रिसॉर्टमध्ये बुकिंग करून राहू शकतात.

सायंकाळी सहाच्या दरम्यान आम्ही लखपत येथे पोहोचलो. लखपत बीच हा भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील उत्तरेकडील दिशेला शेवटचा बीच असून जवळच भारत- पाकिस्तानची सीमा आहे. तेराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास सिंधवर राज्य करणाऱ्या राव लाखा यांच्या नावावर या शहराचे नाव आहे. लखपत हे गुजरातला सिंधला जोडणारे किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे खूप श्रीमंत व्यापारी केंद्र होते.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

किल्ल्याच्या भिंतीमध्ये १६ या शतकातील गुरुद्वारा आणि महादेवाचे मंदिर देखील आहे. असे मानले जाते की गुरु नानक यांनी आपल्या दुसऱ्या (१५०६-१५१३) आणि चौथ्या (१५१९ -१५२१) प्रवासादरम्यान येथे वास्तव्य केले होते. लखपत किल्ल्याची रचना पाहून आम्ही शांत समुद्राकडे नजर टाकली. येथील भव्य समुद्र किनारा पूर्ण सोनेरी रंगाने झाकोळलेला दिसत होता. बीचवरील काही भागावर पांढरा मिठाचा थर दिसत होता आणि ओहोटी असल्याने पाणी ओसरले होते. विशेषतः सूर्यास्त पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येथे येतात. येथील सुंदर सूर्यास्ताचा आनंद लुटला. या किल्ल्यावरून दूरवर असलेल्या पाकिस्तानातील लाइट्‌सही दिसत होत्या.

आम्ही या बीचवरुन फेरफटका मारला आणि जेंव्हा मी या बीचवर उभा होतो, तेंव्हा एक भारतीय असल्याचा अभिमान वाटत होता. आम्ही सर्वांनी तो अविस्मरणीय क्षण मनात साठवून ठेवला. आम्ही भारताच्या पश्‍चिम उत्तरेच्या शेवटच्या बीचवर आमच्या टीमचे छायाचित्रे काढली. नंतर आम्ही भूजमध्ये नित्यानंद गेस्ट हाऊस याठिकाणी रात्रीचा मुक्काम केला. (क्रमशः)

-डॉ. व्यंकटेश मेतन, अस्थिरोगतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय पर्यटक,

सोलापूर. मो. ९३७००८००९०

go to top