esakal | आगामी काळासाठी ‘ट्रेडनीति’ कशी ठेवाल?
sakal

बोलून बातमी शोधा

Trade policy}

आगामी काळासाठी ‘ट्रेडनीति’ कशी ठेवाल?

sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात सलग चार दिवस घसरण झाल्यानंतर आठवड्याच्या अखेरीस १६६ अंशांची उसळी घेत ‘सेन्सेक्स’ने ५२,४८४ अंशांवर बंद भाव दिला. ‘निफ्टी’नेदेखील ४२ अंशांच्या वाढीसह १५,७२२ अंशांवर बंद भाव दिला. गेल्या आठवड्यात निर्देशांकाने एकंदरीत ‘करेक्शन’ किंवा काही काळ विसावा घेतला असला तरी डिव्हिज लॅब, केअर रेटिंग्स, टाटा ॲलेक्सी, ॲस्टर, सीसीएल प्रॉडक्ट्स, विनती ऑरगॅनिक्स आदी अनेक कंपन्यांच्या शेअरने तेजीत वाटचाल केली.

‘ट्रेडनीति’चा वापर आवश्यक

बाजार महाग असताना अनुभवी आणि हुशार ट्रेडर मर्यादितच जोखीम स्वीकारून उत्तम परतावा मिळविणे पसंत करतात. मात्र, नव्या गुंतवणूकदाराने अशा वेळेस भावनाप्रधान होऊन मोठ्या प्रमाणात जोखीम स्वीकारून व्यवहार केल्यास तोटा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यामुळे प्रत्येक वेळेस सर्वच अनुभव स्वतः घेण्यापेक्षा, इतरांच्या अनुभवातून; तसेच बाजाराच्या इतिहासामधून मिळणारे अनेक धडे आत्मसात करणे फायदेशीर ठरू शकते. आगामी काळासाठी ‘टेक्नो-फंडामेंटल’नुसार धंद्यातील भांडवलावर उत्तम परतावा कमवू शकणाऱ्या; तसेच आलेखानुसार तेजीचा कल दाखविणाऱ्या कंपन्यांच्या शेअरने आगामी काळात तेजीची वाटचाल केल्यास मर्यादित जोखीम स्वीकारून तेजीचा व्यवहार करण्याच्या ‘ट्रेडनीति’चा वापर करणे योग्य ठरू शकेल.

मध्यम अवधीसाठी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’

‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ ही कंपनी कॉफीचे उत्पादन, व्यापार आणि वितरण करण्याचे काम करते. या कंपनीच्या शेअरने मागील एक महिना रु. ३७५ ते ३२५ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ३८३ ला बंद भाव देऊन अल्पावधीच्या; तसेच मध्यम अवधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार या कंपनीच्या शेअरचा भाव हा बंद भाव तत्त्वावर रु. ३२४ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार करीत आणखी भाववाढ दिसू शकते.

‘ज्योती लॅब्स’मध्ये तेजीचा कल

‘ज्योती लॅब्स’ या कंपनीच्या शेअरने गेल्या आठवड्यात आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करीत तेजीकडे वाटचाल केली आहे. ‘ज्योती लॅब्स’ ही कंपनी उजाला, प्रिल, मिस्टर व्हाइट, एक्सो, मार्गो आदी अनेक नामवंत उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीचे काम करते. जानेवारी २०२१ पासून रु. १६६ ते १३६ या पट्ट्यात चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. १६८ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीच्या आलेखानुसार या शेअरने तेजीचा कल दर्शविला आहे. या शेअरचा भाव रु. १३५ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत आणखी वाढ होऊ शकते.

दीर्घावधीसाठी गुंतवणूक नीति

गेल्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. (सीडीएसएल) या कंपनीचा शेअर रु. ५७५ ला भाव असताना सुचविला होता. आता या शेअरचा भाव रु. १०३४ झाला आहे. ही कंपनी भारतात ‘सिक्युरिटीज डिपॉझिटरी’ म्हणून कार्यरत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सध्याचा भाव देऊन देखील खरेदी केल्यास दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा मिळू शकतो. मात्र, आगामी काळात भाव घसरल्यास खरेदीची संधी पुन्हा घेण्यासाठी अशा प्रकारच्या धंद्यात उत्तम परतावा मिळविणाऱ्या कंपन्यांमध्ये ठरविलेली सर्व रक्कम एकदम गुंतविण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचे धोरण स्वीकारणे योग्य ठरू शकते.

लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)