

Artificial General Intelligence
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
एजीआय ही केवळ तंत्रज्ञानातील प्रगती नाही, तर ती उत्क्रांतीमधील एक महत्त्वाची पायरी आहे. आपण अशा एका युगाच्या उंबरठ्यावर आहोत जिथं बुद्धिमत्ता ही केवळ ‘जैविक’ न राहता ती ‘डिजिटल’ स्वरूपातही उपलब्ध असेल. हे यंत्र माणसाचा गुलाम असेल की
त्याचा मार्गदर्शक, हे आपण आज आखत असलेल्या नियमावलीवर अवलंबून असेल. मागच्या भागात आपण ‘नॅरो एआय’ (एएनआय) म्हणजेच विशिष्ट कामात तरबेज असलेल्या सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेतलं होतं. मग ते बुद्धिबळ खेळणारा कॉम्प्युटर असो, गुंतागुंतीची आकडेमोड करणारं मॉडेल किंवा तुमच्या फोनमधली साधी ‘सिरी’ असो; पण आज जग ज्या ऐतिहासिक वळणावर उभं आहे, त्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत म्हणतात : ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय). मार्च २०२६च्या या काळात जागतिक तंत्रज्ञान विश्वात जर सर्वात मोठी कोणती चर्चा असेल, तर ती म्हणजे ‘यंत्र माणसासारखा विचार नेमका कधी करणार?’ आणि ‘त्यानंतर मानवाचं अस्तित्व कसं असेल?’ एजीआय म्हणजे केवळ गती नव्हे, तर ती एक प्रकारची ‘डिजिटल जाणीव’ आहे असं काहींचं म्हणणं आहे.