

Artificial Intelligence Technology
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर- saptrang@esakal.com
जग आता एका अशा वळणावर उभं आहे, जिथे युद्ध हे केवळ भूमीवर नाही तर क्लाऊड (Cloud) आणि कोडमध्ये (Code) लढलं जाणार आहे. एआय हे केवळ साधन उरलेलं नसून, तो आता युद्धभूमीवरचा सर्वात प्रभावी ‘कमांडो’ ठरत आहे. युद्धाचं हे बदलतं स्वरूप जितकं तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे, तितकंच ते मानवी अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकतं.
आजचं युद्ध हे केवळ सीमेवरच्या तोफांच्या आवाजापर्यंत मर्यादित उरलेलं नाही, तर ते आता सिलिकॉन चिप्स आणि अल्गोरिदमच्या अदृश्य जगात शिरलं आहे. गेल्या २० वर्षांचा इतिहास पाहिला तर तंत्रज्ञानानं युद्धाची व्याख्याच बदलून टाकली आहे. २००३च्या इराक युद्धापासून ते अफगाणिस्तानातल्या ड्रोन हल्ल्यांपर्यंत अमेरिकेनं सॅटेलाइट गाइडेड मिसाईल्स आणि रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट्सचा वापर करून एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती; पण गेल्या १५ ते १८ महिन्यांत जे घडतंय ते यापूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी पटीनं भयानक आणि वेगळं आहे. आता युद्धात फक्त मशिन नाही, तर स्वयंनिर्णय घेणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि एजंटिक एआय या गोष्टी उतरल्या आहेत.