

ASEAN summit Kuala Lumpur 2025
esakal
डॉ. मनीष दाभाडे
जगातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या आसियान देशांची ४७वी परिषद नुकतीच क्वालालंपूर येथे झाली. आसियान अजूनही संवाद, व्यापार आणि सांस्कृतिक एकतेचे केंद्र राहू शकते. मात्र, या घोषणांना कृतीची जोड मिळाली नाही, तर पुढील दशकात या संघटनेचे केंद्रस्थान हळूहळू कमी होऊ शकते, हे या परिषदेने दाखवून दिले.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे २६ ते २८ ऑक्टोबर या काळामध्ये आग्नेय आशियाई देशांच्या ‘आसियान’ या संघटनेची ४७वी परिषद झाली. आजच्या जगातील बदलत्या आणि अनिश्चित परिस्थितीमध्ये या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व होते. या संघटनेच्या व्यासपीठावर अमेरिका, चीन आणि भारत या तिन्ही मोठ्या देशांकडून आपले आणि प्रादेशिक हितसंबंधांसाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर आपले ऐक्य आणि तटस्थता टिकवून ठेवत प्रादेशिक व्यापार आणि राजनैतिक केंद्र म्हणून स्वतःची भूमिका अधिक मजबूत करण्याचे आव्हान आज ‘आसियान’ देशांसमोर आहे. ‘समावेशकता आणि शाश्वतता’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. त्यातून या परिषदेचे यजमान मलेशियाने आसियान देशांना आर्थिक सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला.