esakal | गांधीजींच्या मनातील रामराज्य

बोलून बातमी शोधा

null}
गांधीजींच्या मनातील रामराज्य
sakal_logo
By
अरुण खोरे

सर्वसामान्यांसाठी आपल्या लोकशाहीने काम केले पाहिजे, तरच रामराज्य निर्माण होईल, ही महात्मा गांधी यांची श्रद्धा होती आणि विश्वासही...! आता लवकरच राम मंदिर उभे राहील; पण गांधीजींच्या संकल्पनेतील रामराज्य साकार झालेले असेल का, की ते स्वप्नच राहील, हा प्रश्न आहे. अयोध्येत राम मंदिर उभे करण्याच्या देशव्यापी तयारीमुळे पुन्हा एकदा राम, रामायण आणि रामराज्य यांचे मंथन सुरू झाले आहे. भारताच्या विसाव्या शतकाच्या इतिहासात राम आणि रामराज्याचा विचार मांडणारा राजकीय नेता म्हणून आणि देशातील सर्वसामान्य लोकांना, अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळीत मार्गदर्शन करणारा महात्मा म्हणून, आपण अर्थातच गांधीजींच्या नेतृत्वाकडे पाहतो. गांधीजींनी ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात आणि नंतर ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ या त्यांनी सुरू केलेल्या नियतकालिकांत रामराज्याचा विचार मांडला आहे. गांधीजींनी मांडलेल्या रामराज्याची संकल्पना समजून घेताना, गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि विशेषतः त्यांच्या विचारविश्वावर रामनामाचा, रामायणाचा आणि संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या ‘रामचरितमानस’ या ग्रंथाचा फार खोलवर परिणाम झाला होता, हे लक्षात घेतले पाहिजे.

‘लहानपणी रंभा नावाच्या दाईने, आपल्याला भीती वाटत असेल, तर रामनामाचा जप करावा, असे सांगितले होते, त्यामुळे तो एक मोठा परिणाम माझ्यावर झाला,’ असे त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. ‘सत्याचे प्रयोग’ वाचताना लक्षात येते, की गांधीजी हे सत्याचा शोध घेत निघालेले पांथस्थ आहेत आणि या सत्याच्या आधारेच ते राजकारण करू पाहतात. प्रस्तावनेत गांधीजींनी तसे स्पष्टपणे म्हटले आहे.‘‘जसजसा मी विचार करू लागतो, माझ्या भूतकालीन जीवनावर दृष्टी टाकीत जातो, तसतसे माझे अल्पत्व मला स्पष्टपणे दिसून येते. मला जे करावयाचे आहे, ज्याच्यासाठी आज तीस वर्षे माझी धडपड चालली आहे, ते तर आत्मदर्शन, ईश्वराचा साक्षात्कार, मोक्ष हेच होय. माझी सर्व हालचाल याचदृष्टीने होत असते, माझे सर्व लिखाण यादृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मी मनोभावाने पडतो तोही याचसाठी.’’ देशभक्त गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरू. त्यांच्याकडून सदाचारी राजकारणाची आणि राजकारणाच्या अध्यात्मीकरणाची वैचारिक भूमिका गांधीजींनी स्वीकारली आणि त्याचे पडसाद त्यांच्या विविध आंदोलनांत उमटले. गांधीजींच्या रामराज्याच्या मूळ संकल्पनेमागे अध्यात्मीकरण आणि नीतीमय राजकारणाचा आग्रह, हे दोन मूलभूत आधार स्पष्टपणे दिसतात.

हेही वाचा: अयोध्या : रामराज्याचे द्वार

धार्मिक-आध्यात्मिक भूमिका

गांधीजींनी जगातील सर्व धर्म, पंथ आणि धर्मग्रंथांचा अतिशय सखोल अभ्यास केला होता आणि त्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या चौकटीत आपले विचार त्यांनी कधीच मांडले नाहीत. तथापि, भारतीय संस्कृतीमधील रामाचे प्रतीक, श्रावणाची कथा आणि महाभारतामधील गीतेचा संदेश या सर्वांचा त्यांनी जाणीवपूर्वक लेखनातून आणि भाषणातून उपयोग केला. त्यामुळे अनेक परदेशी पत्रकार, अभ्यासक, चिंतक या सर्वांनाच गांधीजींच्या या धार्मिक-आध्यात्मिक अशा भूमिकेविषयीचे कुतुहल कायमच वाटत राहिले. इंग्लंडमधील वास्तव्यात आणि नंतर दक्षिण आफ्रिकेतील काळात गांधीजींनी धर्म, अध्यात्म, नीतिमत्ता, विविध धर्मग्रंथ या सगळ्यांचा सर्वंकष अभ्यास केला. याच काळात गांधीजींनी विचारवंत जॉन रस्किन, निसर्गाचे चिंतन करणारा थोरो आणि जीवनाचे वेगळे आकलन असलेले रशियन विचारवंत, विख्यात लेखक लिओ टॉलस्टॉय या महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास केला. टॉलस्टॉय यांच्याबरोबर त्यांचा पत्रव्यवहार झाला. दक्षिण आफ्रिकेतील आपल्या एका आश्रमाला गांधीजींनी ‘टॉलस्टॉय आश्रम’ असेच नाव दिले होते. रस्किन यांनी लिहिलेल्या Unto this Last आणि टॉलस्टॉय यांच्या ‘किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’, या दोन पुस्तकांनी गांधीजींच्या विचारविश्वाला एक वेगळी कलाटणी दिली आणि त्यातून गांधीजी आपल्या चळवळीचा आणि आपल्या सामाजिक जीवनाचा पैलू बदलत गेले. गांधीजींनी रामराज्याची संकल्पना मांडली, ती सगळी याचीच परिणती होती, असे म्हटले पाहिजे.

हेही वाचा: रामायणातील 'राम सेतू'बद्दल 'या' 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी

रामराज्याची संकल्पना

रामराज्याची संकल्पना मांडताना गांधीजींनी १९२९ मध्ये ‘यंग इंडिया’च्या अंकात लिहिले होते, ‘रामराज्य असा शब्दप्रयोग करताना हे ईश्वराचे पवित्र राज्य असेल, असे मी मानतो. रामराज्य म्हणजे हिंदू राज्य नाही. माझ्यादृष्टीने राम आणि रहीम हे दोन्ही समान आहेत. मी सत्य आणि सदाचरण यांनाच ईश्वर मानतो.’ गांधीजी पुढे सांगतात की, ‘माझा राम पृथ्वीवर आहे की नाही, मला माहीत नाही; पण प्राचीन काळातील रामराज्याचा जो आदर्श माझ्या मनात आहे, तो निःसंदेहपणे एका खऱ्या लोकशाहीचा मला वाटतो. अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीलादेखील न्याय देणारे हे रामराज्य होते. आपणही अशाच रामराज्याची स्थापना केली पाहिजे. माझ्या स्वप्नातील रामराज्यात तर राव आणि रंक या दोघांना समान स्थान मिळाले पाहिजे, असे मला वाटते.’ ‘हरिजन’ या नियतकालिकाच्या विविध अंकांमधून गांधीजींनी याबाबत काही विचार मांडले होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी लिहिले होते, ‘आपण ब्रिटिशांचे हाउस ऑफ कॉमन्स किंवा जर्मनी, इटली या देशांच्या राज्यकारभाराची री ओढून तसे करण्याचा प्रयत्न करू नये. भारताला मिळालेले राजकीय स्वातंत्र्य म्हणजे रामराज्य आहे, असे मी म्हणेन. हे रामराज्य सार्वभौम असे खरे लोकराज्य, की जे नैतिकतेच्या बळावर उभे आहे आणि म्हणून ते रामराज्य असे मी मानतो.’

हेही वाचा: कोण आहेत बस्तरचे 'गांधी'? ज्यांच्या प्रयत्नामुळे नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटला कमांडो

फाळणीनंतर स्वप्नाला तडा

अर्थात, गांधीजींच्या रामराज्याच्या स्वप्नाला फार मोठा तडा गेला, तो फाळणी जाहीर झाल्यानंतरच्या दंगलीमुळे! नवी दिल्ली आणि पश्चिम सीमेवर, तसेच बंगाल, बिहारच्या पूर्व सीमांवर दंगली उसळल्या होत्या. प्रचंड हिंसाचार सुरू होता. तो कसा थांबवायचा, याची चिंता भारत सोडून बाहेर पडणाऱ्या ब्रिटिशांच्या व्हाइसरॉयला पडली होती. या परिस्थितीत गांधीजी उभे राहिले आणि त्यांनी नौखालीचा दौरा केला. तेथे शांतता प्रस्थापित केली आणि नंतर ते परतले. शेवटच्या सहा महिन्यांत नवी दिल्लीतील भंगी कॉलनी आणि नंतर काही दिवस बिर्ला हाउसमध्ये गांधीजी मुक्कामाला होते. या काळात दिल्ली आणि पश्चिम सीमेवरील दंगली काबूत आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेहरू, पटेल, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद हे सगळे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत होते. गांधीजींच्या दृष्टीने रामराज्य म्हणजे सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांच्या आधारे उभे असलेले लोकांचे राज्य. पण, फाळणी जाहीर झाल्यानंतरच्या दंगलींमुळे गांधीजी प्रचंड विषण्ण झाले. बिर्ला हाउसमध्ये त्यांच्या रोज प्रार्थना सभा होत असत, त्यांत त्याचे पडसाद उमटू लागले. एका प्रार्थना सभेत गांधीजी म्हणाले, ‘‘अहिंसेच्या नावाखाली आपण आपल्या अंतःकरणात हिंसा वाढवणार असू, तर रामराज्य कसे निर्माण होईल?’’ एकदा तर त्यांच्या अंतःकरणात निराशा अतिशय दाटून आली होती. प्रार्थना सभेत ते म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी या उन्मादातून बाहेर पडले पाहिजे. मी जे सांगतो आहे, ते तुम्हाला पटो वा न पटो... हे जे सर्व भयंकर काही अवतीभोवती घडते आहे, त्याचा साक्षीदार होण्याची मला इच्छा नाही. धर्म आणि मानवता हे इतक्या खालच्या पातळीला गेलेले मला पाहवत नाही!’’

हिंदू-मुस्लिम सलोख्याचा विचार

फाळणीच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी हिंदू-मुस्लिम सलोख्याचा, सहिष्णुतेचा विचार प्रार्थना सभेत नेहमीच मांडला. ‘हे माझे दोन डोळे आहेत,’ असे ते अनेकदा म्हणत असत. प्रार्थना सभेतून सतत रामधून म्हटली जात असे. विविध धर्मग्रंथांतील रचना सादर होत असत. गांधीजी आवर्जून रामराज्याची भाषा बोलत होते. ते म्हणाले, ‘‘रामराज्य आपल्या सर्वांना आणायचे आहे; पण तुमचे सहकार्य जर नसेल, तर ते कसे येईल?’’ एकदा त्यांची प्रकृती बरी नव्हती, खोकला वाढला होता. दिवस थंडीचे होते, त्यामुळे डॉक्टरांनी पेनिसिलीन घेण्याचा सल्ला दिला. त्यावर गांधीजी म्हणाले, ‘‘रामनाम हेच माझे पेनिसिलीन आहे.’’ अखेरच्या काही दिवसांत पुन्हा एकदा गांधीजी मृत्यूची भाषा करू लागले होते. गांधीजींच्या प्रार्थना सभेच्या जागी, २० जानेवारी १९४८ रोजी बॉम्बस्फोट झाला. त्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. गांधीजी डगमगले नव्हते. त्यानंतरच्या प्रार्थना सभेत ते म्हणाले, ‘‘माझ्या अवतीभोवती गोळीबार सुरू असताना मला मरण आले, तर रामाचे नाव माझ्या मुखी आले पाहिजे, ही माझी प्रार्थना आहे.’’ अखेर ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थना सभेला जाताना गांधीजींचा खून झाला. शेवटचा श्वास घेताना गांधीजींनी हात जोडले आणि ते उद्गारले, ‘‘हे राम..!’’ गांधीजींच्या मनातला राम कोणता होता, यासंबंधी विनोबांनी आपल्या आठवणींत लिहिले आहे, ‘गांधीजींनी हे रामाचे नाव घेतले, तो राम कोणता? हा तो राम, ज्याचे नाव दशरथाने आपल्या मुलाला ठेवले. परशुराम, बलराम, रामभाऊ यांच्या पित्यांनीही आपल्या मुलांना त्याचेच नाव ठेवले होते. दशरथाचे राम मोठे अवतारी पुरुष होऊन गेले; पण हे जे ‘रामनाम’ आहे, ते दशरथाच्या रामापेक्षाही प्राचीन आहे. रामनामवाला राम सर्वांच्या हृदयात रममाण होणारा परमेश्वर आहे आणि या रामाचे नावच गांधीजींनी घेतले.’ गेल्या वर्षी अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन करताना पंतप्रधानांनी गांधीजींचा उल्लेख केला. ‘‘गांधींनी रामनामाचे माहात्म्य ओळखले होते, त्यांना त्याची अनुभूती सतत येत होती. तरी एका ठिकाणी ते म्हणाले, ‘परमेश्वराचे दर्शन मला झालेले नाही; पण माझ्या अवतीभोवती जे लक्षावधी लोक आहेत... नाडलेले, पिचलेले हे सगळे लोक मला दिसत आहेत. मला परमेश्वर त्यांच्यात दिसतो.’ अशा सर्वसामान्यांसाठी आपल्या लोकशाहीने काम केले पाहिजे, तरच रामराज्य निर्माण होईल, ही त्यांची श्रद्धा होती आणि विश्वासही!’’ आता लवकरच राम मंदिर उभे राहील; पण गांधीजींच्या संकल्पनेतील रामराज्य साकार झालेले असेल का, की ते स्वप्नच राहील हा प्रश्न सर्व सुजाण नागरिकांच्या मनात निर्माण होत राहील!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)