

Zirah Bakhtar Chilkhat
esakal
परवा लेख लिहायला बसले आणि मनात विचार आला की, या वेळी कशावर लिहूया? तोफा...की वाघनखं, की माडू? नको, एखाद्या भूज किंवा हलदाईवर वगैरे लिहूया! तेवढ्यात मागून कोणी तरी हटकलं. मी दचकून वळून पाहिलं, तर मागे ‘ते’ उभे होते, लहान-मोठे..बरेच जण होते! मी विचारलं, ‘‘काय आहे?’’ तर एका सुरात म्हणतात कसे, ‘‘सदर संपायला आलं, तरी आमची आठवण नाही की काय? आम्ही काय घोडं मारलंय! मुळात आम्ही मारणारे नाहीच, आम्ही तर युद्धात तारणारे!’’ ती होती संरक्षक आयुधं!
शस्त्रं आणि संरक्षक आयुधं यांचं नातं म्हणजे शतकानुशतकांचा उंदीर-मांजराचा खेळ. खूप चांगल्या शस्त्रापासून युद्धभूमीत संरक्षण करण्यासाठी अजून चांगलं संरक्षक आयुध बनवायचं आणि खूप चांगलं संरक्षक आयुध भेदण्यासाठी अजून चांगलं शस्त्रं बनवायचं अशी साखळी वर्षानुवर्षे चालू आहे! ‘संरक्षक आयुधं’ या श्रेणीमध्ये विविध प्रकारची चिलखतं, शिरस्त्राणं, बाजूबंद, खोगी, राक अशा आयुधांचा समावेश होतो.