

Marathi film Babu Band Baja story
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
मिताली जगताप नावाची अतिशय उमदी अभिनेत्री पिंजानीने हुडकून काढली. तिनं या सिनेमात अप्रतिम असं काम केलं होतं. मितालीच्या चेहऱ्यात एक जादू होती. अनेकांना हेवा वाटावा असं काम केलं मितालीनं. तिचं काम बघून प्रीमियर झाल्यावर मी तिला म्हणालो होतो, ‘‘कोट शिवायचा एक.’’ त्यावर ती तिचे लाघवी हसली होती, तेच खरं ठरलं. त्या वर्षीची ती देशभरातील सर्वोत्तम अभिनेत्री ठरली... जिंकली...
‘‘तू मेरी फिल्म में काम मत कर. कमसे कम मिल तो सही दादा...’’
नुकताच ‘पारध’ नावाचा चित्रपट येऊन गेला होता. बऱ्यापैकी मानधन मागायची थोडी ताकद येत होती... ‘पारध’ सिनेमा संपल्यावर मी पहिली सेकंडहँड गाडी घेतली. ती गाडी घेऊन मी पिंजानी याचं ऑफिस गाठलं, ते ऑफिस तेव्हा सेनापती बापट रोडला होतं. तो मला खाली घ्यायला आला. पुढचे चार तास तो मला ‘बाबू बँड बाजा’ सिनेमाची स्टोरी सांगत होता. उठून... बसून... खुर्चीत... त्यानं मला नॅरेशन दिलं.
त्याचं ते नॅरेशन अतिशय लाघवी होतं. एक काळ असतो जेव्हा तुम्ही पडेल ते काम करता आणि एक वर्तमान समोर येत तुम्ही त्या पर्टिक्युलर सिनेमात काम करावं म्हणून नॅरेशनच्या माध्यमातून त्या सिनेमाचा दिग्दर्शक तुम्हाला ‘करा या सिनेमात काम’ म्हणून कनव्हेन्स करतो.
ही सगळी कृपा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची आहे.
नॅरेशन ऐकून मी पिंजानीचं ऑफिस सोडलं. जे काही त्यानं ऐकवलं होतं ते मनात अडकलं होतं. त्यावर व्यावसायिक नट म्हणून आपली जडणघडण होत असते. त्यामुळे मी त्याला फार काही दाखवलं नाही.
त्याच्या ऑफिसमधील त्याचे सहकारी त्याला सांगत होते. अर्थात हा मिसिंग एपिसोड त्याने मला नंतर सांगितला.
नुकताच ‘नटरंग’ येऊन गेला होता. ‘पारध’ या सिनेमाची पण चर्चा होती. त्याचे सहकारी त्याला म्हणत होते - ‘याला घेऊ नका. हा खलनायक आहे. आपला जो जगदीश बावणे आहे तो गरीब, कणाहिन आहे. मत लो सर इसको मत लो...’
उत्तरादाखल पिंजानी त्यांना इतकंच म्हणाला, ‘‘उसकी आँखे देखी... वही है जगदीश बावणे... तुम लोक समझते नहीं हो...’’
पिंजानी भेटण्यासाठी मुंबईला आला. तेव्हा ‘झुलवा’ नाटकाचे प्रयोग करत होतो. प्रयोगात अंतर पडे त्यामुळे तालमी कराव्या लागत.