

Babu Band Baja
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
सकाळपासून माझा डावा पाय सुजायला लागला होता. मी पेनकिलर घेत होतो; पण काहीच फरक पडत नव्हता. दुपारी ती सूज वाढायला लागली. मग डॉक्टर बोलवले. त्यांनी इंजेक्शन दिलं. संध्याकाळी पाय टरारून फुगला. कडक झाला. मग मला चालता येईना. कसंबसं शूटिंग केलं. रात्री निघालो. पायाचं दुखणं वाढलं. लंगडत-लंगडत गाडीत बसलो. दाह वाढतच होता. सूजही वाढत होती. रात्री झोपलोच नाही इतकी वेदना...
‘‘निकलो, निकलो जल्दी निकलो. जब तक तुम नहीं आओगे मैं फिल्म चालू नहीं करूंगा...’’
राजेश पिंजानी फोनवर घाईघाईत मला निघायचा आग्रह करत होता. चार वाजता मी पुण्यात ई-स्क्वेअर या मल्टीफ्लेक्सला पोचलो. पिंजानी वाट पाहत होता... गर्दी जमा होऊ लागली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे सिनेमाबद्दल कुतूहल होतंच... आणि काही निवडक आमंत्रित होते.
आत जाताना सिक्युरिटीनं मला जुजबी चेक केलं. पिंजानीला मात्र नखशिखांत चेक केलं. तो त्या गार्डवर चिडला. (अर्थात खोटं-खोटं).
‘‘इसको क्यू कम चेक किया? मुझे तो पुरा खंगाल लिया तुम लोगोंने.’’
या अशा घटना घडल्या, की तो मला गमतीने ‘तू गरीबोंका अजय देवगण है’ असं म्हणून अगदी मोकळंढाकळं नागपुरी हसायचा. सगळी आमंत्रितांची तिकिटं पिंजानीकडे होती. मी आणि तो दाराशी उभे होतो.
लोक आले, की तो गेटकीपर माझ्याकडे पाहायचा. पिंजानी लोकांमध्ये मिसळलेला असायचा. तो गेटकीपर पुन्हा माझ्याकडे पाहायचा. मी जाऊ द्या असं म्हणायचो... लोक आत जात होते. असं बऱ्याच वेळा घडलं. थोड्या वेळानं बातमी आली... थिएटर फुल्लं झालंय. आत कुणाला सोडू नका... पिंजानी चक्रावलाच.
‘‘सारा थिएटर मैने खरीद रक्खा है... टिकट मेरे पास है. लोक अंदर कैसे गये? थिएटर भर कैसे गया?’’ मग त्यानं माझ्याकडे पाहिलं. पुन्हा खांद्याशी भिडून ‘मै तेरेको ऐसेही नही गरीबों का अजय देवगण बोलता.’