
Bacchu Kadu Politics
esakal
मी महाविद्यालयीन जीवनात आलो आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ या विचाराने अक्षरशः झपाटून गेलो. माझ्या रक्तात समाजासाठी झटायची आग होतीच, त्यात विचारांचं खतपाणी मिळालं. माझा हा सगळा प्रवास समाजकारणातूनच राजकारणाकडे वळला. माझ्या जीवनातील प्रत्येक चढ-उतार, प्रत्येक संघर्ष हाच माझा खरा ठेवा आहे.
मित्रहो, आज मी तुमच्याशी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली, हा प्रवास किती खडतर, थरारक आणि वेड्या गमतींनी भरलेला होता, ते सांगणार आहे. आज मी ज्या ठिकाणी आहे, तिथे पोहोचायला कितीतरी कष्ट, अपमान, हशा, लढाई आणि जीव ओतून केलेली समाजसेवा कारणीभूत आहे.
चांदूरबाजार तालुक्याच्या ठिकाणी गो. सी. टोम्पे महाविद्यालयात बी. कॉम.ला प्रवेश घेतल्यावर माझ्या आयुष्यातली खरी राजकीय वाटचाल सुरू झाली. पहिल्याच दिवशी मी सगळ्यांच्या नजरेत आलो. कारण काय? तर बेलोऱ्यावरून चांदूरबाजारला दूध वाटपासाठी मी कधी घोड्यावर बसून, कधी सायकलने दोन्ही बाजूंना दुधाचे कॅन लटकवून; तर कधी रंग उडालेल्या जुनाट चारचाकी मेटाडोअरवरून कॉलेजला जायचो. त्या काळी कुठली मोटारसायकल, स्कूटर नव्हती आणि मी घोडा थेट कॉलेजच्या सायकल स्टॅण्डवर बांधायचो. माझा हा कारनामा विद्यार्थ्यांना तर जबरदस्त मनोरंजनाचा विषय व्हायचा आणि कॉलेज प्रशासनाच्या डोक्याला मोठीच कटकट. काही जिवलग दोस्त घोडा सोडून द्यायचे; तर दुसऱ्यांवर घोडा सोडल्याचा आरोप ढकलून द्यायचे आणि मग त्या निमित्ताने गदारोळ, भांडणं, बाचा-बाची व्हायची.