Beyond Politics: Bringing Light to Lives with a Social Mission
Esakal
बच्चू कडू
एक आजी नेहमी माझ्याकडे यायची. ती म्हणायची, ‘बच्चू, माझ्या डोळ्यांना दिसत नाही. मी भाकरी टाकू शकत नाही. त्यामुळे मला उपाशी राहण्याची वेळ येत आहे.’ तिच्या डोळ्यातला मोठ्ठा पिवळा डाग माझ्या मनात कायमचा कोरला गेला आणि त्यातूनच ठरलं, ‘आपण मोतीबिंदू शिबिर घ्यायचं... गावोगावच्या लोकांना दृष्टिदान द्यायचं.’ आम्हाला उमगलं - समाजकार्य ही फक्त सभा-प्रचारातली भाषा नसते; तर प्रत्येक गरिबाच्या आयुष्यात प्रकाश आणणं, हाच खरा राजकारणाचा मार्ग आहे.
तो काळ खूप वेगळा होता. गरिबी, हालअपेष्टा, उपासमार हीच दैनंदिनी होती. शेतकरी, शेतमजूर, स्त्री-पुरुष यांच्या आयुष्यात कामाचा अंत नव्हता; पण सुखाचा तुकडाही नव्हता. अशा वेळी काही आजार लोकांना अक्षरशः अधमुठा करायचे. त्यात सर्वांत भयंकर आजार म्हणजे डोळ्याचा मोतीबिंदू.
गावाकडे डोळ्यांची काळजी घेणं कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे हे कुणाला माहीतच नव्हतं. फार तर डोळे दुखले, की किराणा दुकानात मिळणारा निंबोळीचा ट्यूब घेऊन डोळ्यात टाकायचा, एवढंच उपचाराचं ज्ञान होतं. गावोगावी मला कितीतरी वृद्ध दिसायचे, डोळ्यावर पिवळसर डाग, पडदा झाकलेला आणि संपूर्ण अंधार... घरकाम बंद, शेतीतलं काम बंद, जीवन म्हणजे ओझं...