

Prahar Sanghatana Bachchu Kadu
esakal
‘प्रहार’ म्हणजे साधं नाव नाही. ते आमच्या सहकारी, कार्यकर्त्यांच्या जिद्दीचं प्रतीक आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द आहे. दुर्बलाच्या बाजूने उभं राहण्याचं बळ आहे. प्रहार म्हणजे ‘ज्याला आधार नाही, त्याचा आधार आम्ही.’ आम्ही त्या रात्री ठरवलं, हा लढा सत्ता मिळवण्यासाठीही नाही. तो आहे जनतेसाठी, न्यायासाठी, सन्मानासाठी...
९९ चं वर्ष... आमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. विधानसभेची ती निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढलो होतो. गावोगावी फिरलो, लोकांना भेटलो, त्यांच्या सुख-दुःखात उभं राहिलो; पण निकाल लागला तेव्हा समजलं, की आम्ही फक्त १,१०० मतांनी हरलो आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र आल्या होत्या. साधारण माणूस गोंधळतोच. चिन्हं सारखीच, उमेदवारांचे फोटो नसलेलं मतदानपत्र, नावांची गर्दी आणि त्या गोंधळाचा मोठा फटका आम्हाला बसला; पण त्या पराभवाचा काटा मनात घर करून बसला असला तरी एक वेगळीच शक्ती आम्हाला मिळाली... लोकांनी एका सामान्य अपक्ष उमेदवाराला जवळजवळ विजयाच्या दारात नेऊन ठेवलं होतं. तो आमच्यासाठी पराभव नव्हता, तो आशीर्वादाचा पर्व होता.