

Indian Stock Market
esakal
भूषण महाजन
रुपयाच्या घसरणीचा पुरेसा फायदा आयटीला होत नाही, कारण त्यांना चलनाचे ‘हेजिंग’ करावे लागते. तसे वाहन उद्योगाचे नाही. निर्यातीत दुबळ्या रुपयाचा चांगलाच फायदा होतो. एकूण विक्रीत निर्यातीचा वाटा ४४ टक्के आहे. त्या जोरावर बजाज ऑटोने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मजबूत कामगिरी नोंदवली आहे.
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात (ता. २० ते २४ जुलै) निफ्टीने महत्त्वाची तांत्रिक आधारपातळी गमावली. त्यामुळे अल्पकालीन चित्र काहीसे कमकुवत झाले असून, येत्या काही दिवसांत अस्थिरता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नफावसुली व जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेली सावध भूमिका आणि महत्त्वाच्या खासगी बँकांनी जाहीर केलेले तिमाही निकाल शेअर बाजाराच्या पसंतीस उतरले नाहीत. रिलायन्सच्या निकालासंबंधी वाटणारी अवाजवी आशा फोल ठरली आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र वगळता उर्वरित बाजाराने मान टाकली. सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी एकेक पाऊल मागे येत निफ्टी २३७६७ अंशावर थांबली.