

Bathukamma Festival History
esakal
बथुकम्मासमोर पहिले गाणे ‘बथुकम्मा बथुकम्मा उय्यालो’ म्हटले जाते. सातव्या दिवशी, अविवाहित आणि नवविवाहित मुली एकत्र बथुकम्मा खेळ खेळतात. देवी ही कृषीमाता, भूमाता असल्याचे प्रमाण ही गाणी देतात. ‘बथुकम्मा बथुकम्मा उय्यालो’ या नावाने तिची आठवण केली जाते,
तेलुगू भाषेत ‘बथुक’चा अर्थ जीवन तर ‘अम्मा’चा अर्थ आई (भूमाता) असा होतो. ती प्रजेची रक्षण करणारी आणि धनाची देवी आहे. तेलुगू भाषेत बथुकम्माला अक्कदेवता, सात बहिणी, सप्तमाता असेही म्हणतात. या लोकसंस्कृतीने तेलुगू, मराठीसह तमिळ भाषेतील लोकसंस्कृतीला एका धाग्यात गुंफले आहे. अर्थात हा धागा मातृदेवतेचा आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील गोदावरी नदीच्या खोऱ्यात बथुकम्माची लोकसंस्कृती प्रवाहित झालेले दिसते. या देवीवरील गाणी, लोककथा आणि समूहगीते विविध जाती-जमातींच्या महिलांनी जतन केली आहे. बथुकम्मावर प्रामुख्याने उय्यालो गीते गायली जातात. कोटिलिंगा प्रदेशातील स्त्रियांनी गायलेल्या बथुकम्मा गीतांमध्ये (अक्केव्वा गीते) महाराष्ट्रातील नांदेड (नादेरे) असा उल्लेख आढळतो.
बथुकम्मामध्ये महिलांच्या खेळाची विशेष लोकसंस्कृती असून, विविध फुलांनी सजवलेल्या बथुकम्माशेजारी फेर धरून महिला गाणे गातात आणि विविध प्रकारचे खेळही करतात. सातवाहन राजाने दक्षिण भारतात गोदावरी नदीच्या काठावर कोटिलिंगम येथे (इ.स.पू. ७८ मध्ये) पहिले साम्राज्य स्थापन केल्यानंतर त्याचा मुलगा सातकर्णी याने आपल्या राज्याचा दहा दिशांना विस्तार केला, त्यामुळे बथुकम्मा खेळाची संस्कृती त्या त्या विस्तार क्षेत्रांमध्ये पसरली. त्याचे राज्य गोदावरी नदीच्या काठाने पश्चिमेकडे महाराष्ट्रातील पैठण, नाशिक आणि नांदेड या शहरांपर्यंत पसरले असल्याने ‘बथुकम्मा’ खेळ त्या भागांमध्ये पसरला; तो आजही खेळला जातो.