
Tech Alternatives
esakal
ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामुळे जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक देशांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत स्वदेशीचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशी ॲप्स पर्याय म्हणून उपलब्ध झाले आहेत.
देशात गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवस्था मजबूत होत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध क्षेत्रांतील संशोधन अन् स्टार्टअप्समुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. सोशल मीडिया, ई-कॉमर्स, फिनटेक, मनोरंजन आदी क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ हल्ल्यामुळे केवळ उद्योग-व्यवसायच नव्हे, तर अन्य विविध क्षेत्रांतही आत्मनिर्भर होण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. मुळात भारत हा अमेरिकन ॲप्ससाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील ५० कोटींहून अधिक लोक अमेरिकेतील विविध ॲप्सचा वापर करतात.