

Bhudargad Fort Information
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
घनदाट जंगलांनी वेढलेला, दुहेरी तटबंदीने सजलेला आणि पांढऱ्याशुभ्र ‘दूधसागर’ तलावाने नटलेला भुदरगड हा इतिहास व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ आहे. स्वराज्याच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा दुर्ग आजही आपल्या वैभवशाली भूतकाळाच्या खुणा जपून उभा आहे.
दुर्गम गडकिल्ले ज्या पर्वतरांगावर आहेत असा सह्याद्री पर्वत आहे. या गडदुर्गांनी मराठ्यांचा इतिहास घडवला. सह्याद्रीवर जैवविविधता आहे. तसेच उंचच उंच अभेद्य, अजिंक्य आणि दुर्गम गडदुर्ग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना आणि गडदुर्गांना अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवले. आपण जसे तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, येसाजी कंक, शिवाजी काशिद, बहिर्जी नाईक, वीर बाजी पासलकर, कृष्णाजी बांदल, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, दर्यासारंग दौलतखान, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, प्रतापराव गुजर यांचे स्मरण करतो तसेच आपण शिवनेरी, रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळा, विशाळगड, वासोटा, रांगणा, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, लोहगड, रामसेज, जिंजी, वेल्लोर, पुरंदर, सिंहगड, भुदरगड इत्यादी गडांचेदेखील स्मरण करायला हवे. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत असंख्य गडदुर्गांचा मोलाचा वाटा आहे. या असंख्य गडदुर्गांपैकी कोल्हापूर जिह्यातील महत्त्वाचा दुर्ग आहे भुदरगड!
भुदरगड हा गिरीदुर्ग असून तो प्राचीन आहे. हा गड इ. स. बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला. शिलाहारनंतर देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली हा गड होता. अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर दक्षिण भारतात इस्लामी सत्तेने पाय पसरले. बहमणी सत्तेची स्थापना झाली. बहमनीचा ऱ्हास होऊन त्यातून पाच मुस्लिम शाह्या दक्षिण भारतात निर्माण झाल्या. त्यापैकी आदिलशहाने भुदरगड ताब्यात घेतला. मध्ययुगीन काळात गडदुर्ग हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. गडदुर्गाच्या माध्यमातून सभोवताली सत्ता गाजवायची, गडाच्या मदतीने स्थानिक प्रजेचे शोषण करायचे, गडदुर्ग हे सत्ताधीशांचे संरक्षण स्थळ होते. त्यामुळे गडदुर्ग ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष असायचा.