

Bihar election poll surveys accuracy
esakal
संजय कुमार
बिहारसह इतर राज्यांतही मतदार शेवटच्या क्षणी सखोल विचार करून आपला मतदानाचा निर्णय घेतात. असे पुरावेही उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काही आठवडे किंवा महिने आधी घेतलेली सर्वेक्षणे मतदारांच्या त्या वेळच्या ‘राजकीय मनःस्थिती’चे मोजमाप करण्यासाठी निश्चितच उपयुक्त असतात. परंतु अशा सर्वेक्षणांवर आधारित निवडणूक निकालांचा नेमका अंदाज देणे अत्यंत कठीण काम आहे. अशा वेळी कोणत्याही निवडणूक मतदान विश्लेषकांची खरी कसोटी लागते.
बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ मध्ये कोणता पक्ष किंवा आघाडी विजयी ठरेल याचा लवकर अंदाज बांधणे हे अत्यंत कठीण काम का आहे, यामागे अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम निवडणुकीची घोषणा होऊन अवघ्या दोन आठवडेच झाले असताना दोन प्रमुख आघाड्यांमध्ये म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधनमध्ये जागावाटपाचा प्राथमिक ताळमेळ साधला गेला. परंतु उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. या राजकीयदृष्ट्या संवेदनशील अन् सततच्या बदलत्या परिस्थितीत, अनेक मतदारांना अजून आपल्या मतदारसंघातील उमेदवार कोण आहे हेच ठाऊक नाही. त्यामुळे या टप्प्यावर घेतलेल्या आरंभीच्या सर्वेक्षणांमध्ये मतदारांनी दिलेले मतप्राधान्य प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर बदलू शकते.