
कल्याणी शंकर
या वर्षअखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकालाचा अंदाज लावणे सध्या तरी अत्यंत कठीण आहे. कारण ते सध्या अनिश्चित वाटत आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप), संयुक्त जनता दल (जदयू), राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षासाठी ही निवडणूक सहजसोप्या विजयाची हमी देणारी ठरणार नाही. बिहारच्या राजकारणात सध्या वादळापूर्वीची शांतता सुरू आहे.
बिहारच्या राजकीय वर्तुळात सध्या वर वर शांतता दिसत असली तरी महत्त्वाच्या राजकीय घडामोडींची घुसळण सुरू आहे अन् त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दशकांहून अधिक काळ संयुक्त जनता दलाच्या पाठबळावर कार्यरत असलेला भाजप प्रमुख भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी राजदने बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी निर्धार केला आहे. या सर्व बाबींमुळे आगामी निवडणुका कोणत्याही युतीसाठी सोप्या नसतील. सर्वच पक्षांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील अन् डावपेचांत बदल करावे लागतील.