

Congress Defeat Bihar
Sakal
बिहारच्या मतदान प्रक्रियेत‘एनडीए’चा दणदणीत विजय झाला, तर ‘महाआघाडी’चा पार सुपडासाफ झाला. त्यातही काँग्रेसची अवस्था आणखीनच बिकट झाली. काँग्रेसचा पारंपरिक मतदारही काँग्रेसपासून दूर जात असल्याचे चित्र बिहारमध्ये दिसले. विविध जातिसमूहांची मानसिकता समजावून घेण्यातही पक्ष अयशस्वी ठरला. असे का झाले, याचा विचार करणे आता आवश्यक आहे. पुढील वर्षी सहा राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. जे काही करायचे असेल, ते लवकर करावे लागेल. काँग्रेसचा ‘पुनर्जन्म’ होईल का, हाच खरा प्रश्न आहे.
बिहार निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. ‘एनडीए’च्या प्रचंड विजयानंतर त्यांनी काँग्रेस पक्षावर कम्युनिस्ट माओवादी म्हणूनही टीका केली. लोकसभा; तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये सतत पराभव होत असून, सकारात्मक राजकीय दिशेचा अभाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांची काँग्रेसवरील टीका नवीन नाही. त्यांना संधी मिळाली की ते काँग्रेसवर टीका करतात. गेल्या काही वर्षांत या टीकेची धार आणखी तीव्र झाली आहे.