

Bihar election
esakal
बिहार निवडणुकीत ‘एनडीए’ला प्रत्येक जागेवर अत्यंत चुरशीची अन् तुल्यबळ लढाई करावी लागत आहे. ‘महागठबंधन’ने जातीय समीकरणांवर आधारित तिकिटे वाटल्याचे भाजप नेतेच खासगीत मान्य करत आहेत. मतांमध्येही थोडासाही बदल कोणत्याही युतीला अडचणीत आणू शकतो. प्रशांत किशोर ऊर्फ ‘पीके’ यांचा ‘जनसुराज पक्ष’ काही जागा जिंकू शकेल, असे आधी वाटत होते. तथापि रणधुमाळी तीव्र झाल्यानंतर मतांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. जनसुराज पक्षाला ‘एनडीए’ किंवा ‘महागठबंधन’प्रमाणे कोणताही सामाजिक आधार दिसत नाही. त्यामुळे ही निवडणूक द्विध्रुवीय म्हणजे ‘एनडीए’ विरुद्ध ‘महागठबंधन’ अशीच होण्याची चिन्हे आहेत.
बा ण’ म्हणजे ‘कंदील’ आहे का अन् ‘कमळ’ म्हणजे ‘हेलिकॉप्टर’ आहे का? असे कोडे सध्या बिहारमध्ये विचारले जात आहे. होय. संयुक्त जनता दलाचा ‘बाण’ म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचा ‘कंदील’ आहे आहे का? अन् भाजपचे ‘कमळ’ चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे ‘हेलिकॉप्टर’ आहे का? ६ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेच्या १२१ जागांसाठी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी सर्वांना या कोड्याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. निवडणूक होण्याआधी इतक्या लवकर असे कोडे विचारण्यामागची तर्कसंगती कोणती? पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या २४३ जागांपैकी १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या १२२ जागा २० जिल्ह्यांतील आहेत, तर उर्वरित १२१ जागा १८ जिल्ह्यांतील आहेत. बिहारची ही राजकीय लढाई पाहण्यासाठी दिल्लीहून आलेल्या एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने ‘सकाळ’शी अनौपचारिक संभाषणात मला हेच कोडे विचारले. या कोड्याचे धागे निवडणुकीनंतरच्या समीकरणांशी जोडलेले आहेत. प्रथम या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू अन् नंतर मतदानाच्या पहिल्या टप्प्यावर चर्चा करूयात.