
बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चा होत आहे. त्यातच, शेतीचे हंगाम संपल्यामुळे, या काळात गुन्हेगारी वाढते, अशा आशयाचे वक्तव्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केल्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. गुन्हेगारीचे वास्तव आणि त्याविषयीचे जनमानस यामध्ये असणारे अंतर सत्ताधारी पक्षासाठी त्रासदायक ठरू शकते.
वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे मोहोळ उठले आहे. त्यातच, राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कुंदन कृष्णन यांनी वाढत्या गुन्हेगारीचा संबंध शेतीतील संपलेला हंगाम आणि त्यातून असणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांमधील बेरोजगारीशी जोडला आहे. त्यांच्या या राज्यात मे आणि जून महिन्यामध्ये सुपाऱ्या घेऊन खुनांचे प्रमाण वाढतात, तसेच छोट्या-मोठ्या चोऱ्याही होतात, असे कृष्णन यांचे म्हणणे आहे. शेतीच्या दोन मोठ्या हंगामांमधील हा काळ असतो. या काळामध्ये शेतमजूर बेरोजगार असतात. त्यामुळे ते झटपट पैसे मिळविण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात, असा दावा कृष्णन करतात.
यातील एका घटनेमध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेला चंदन मिश्रा हा गुन्हेगार वैद्यकीय उपचारांसाठी पॅरोलवर बाहेर आला होता. त्याच्यावर पाटण्याच्या पारस एचएमआरआय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी या खुनासाठी चार लाखांची सुपारी घेतल्याचे समोर आले आहे. याशिवाय, उद्योगपती गोपाल खेमका यांची चार जुलै रोजी हत्या झाली होती. त्यांच्या मारेकऱ्याने १० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. लागोपाठ झालेल्या या खुनांच्या या घटनांचा संबंधही शेतीच्या हंगामांशी जोडण्यात आला. विशेषतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने जोडलेल्या या संबंधांमुळे त्याचे पडसाद उमटले. त्यावरून सरकारवर आरोप झाले आणि सोशल मीडियावरही सरकारविरोधात संशयाची राळ उठविण्यात आली.