

Muscle power in politics
esakal
बाहुबली नेते.... हा बिहारच्या राजकारणातील फिअर फॅक्टर... कुणीही, कितीही सुशासनाचे वादे केले तरीसुद्धा त्यांना वगळून राजकारण होऊ शकत नाही. जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाला बाहुबलाचा आधार मिळाल्याशिवाय सत्तेचे समीकरण जुळत नाही हे राजसत्तेला कळून चुकलेय. यंदाची बिहार विधानसभा निवडणूक या मनी अन् मसल पॉवरमुळे गाजणार आहे.
हमारी पहचान ही चुनाव जितने से बनी है, अगर वही नही लड पाए तो हमारा जरूरत नही रहेगा किसीको, इस बार हमारे भी अस्तित्व की लडाई है.. या इस बार या उस पार...
रुपेरी पडद्यावरील बिहारच्या राजकारणातील बाहुबली हारून शाह अली बेग याच्या तोंडचं हे वाक्य जसं त्याची राजकीय अगतिकता दाखविते तसंच त्यातून बिहारमधील सत्तेचे वास्तवही अधोरेखित होतं. इथं सत्तेला बाहुबली लागतात अन् बाहुबलींनाही सत्तेशिवाय करमत नाही. ज्यांच्यासाठी हा निवडणुकीचा घाट घातला जातो ती जनता मतदान होईपर्यंतच राजा असते. एकदा बटण दाबले की सगळंच चित्र बदलते, निवडून येणारा लोकप्रतिनिधी आपल्या सोयीने पटमांडणी करू लागतो... रातोरात निष्ठा बदलल्या जातात, शपथविधीपूर्वी मालदार खात्यांसाठी कधी उघडपणे तर कधी लपूनछपून तोडपाणी केलं जातं. विरोधातील सत्तेत अन् सत्तेमधील विरोधी बाकावर कधी जाऊन बसतात, हे कुणालाच समजत नाही.