
स्वतंत्र भारतात चित्रपट उद्योगानं जणू कात टाकली. मुख्य प्रवाहाच्या हिंदी सिनेमाच्या रेशमी धाग्यात अवघा देश नकळत बांधला गेला. सर्वांना आवडणारा सिनेमा करण्याची चुरस लागली. नवे चेहरे, नवे कथानक, नवे संगीत घेऊन येणाऱ्यांची गर्दी उसळली. फाळणीचा, स्थलांतराचा घाव खोल गेला होता. तो जणू विसरण्यासाठी चित्रपटाच्या पडद्यावर मनोरंजनाची आरास सजली. ‘लोकप्रियता’ हाच उद्देश समोर ठेवून चित्रपटाची निर्मिती होऊ लागण्याकडे कल होता. अशा वेळी कॅमेऱ्याच्या डोळ्यातून मानवी संवेदना रजतपटावर दाखवणारे बिमल रॉय कलकत्त्याहून आले. अशाश्वत सिनेमाविश्वात एक ओळ कायमची कोरून गेले. अपनी कहानी छोड जा...
मुंबईमध्ये एकवटलेल्या चित्रपट व्यवसायात आता लोकप्रियता हा निकष प्रामुख्याने दिसत होता. लेखन हा एक स्वतंत्र विभाग असे. आता तिथे हिंदी-मराठीतील नामवंत साहित्यिक, लेखकांची वर्दळ कमी होऊ लागली. फिल्मी पार्ट्यांना विशेष महत्त्व येऊ लागले. बड्या स्टारची चलती होऊ लागली. अशा काहीशा विपरीत परिस्थितीत कलकत्त्याहून बिमल रॉय ६ फेब्रुवारी १९५० रोजी मुंबईत आले. सुविद्य पत्नी मनोबीना, लहान रिंकी याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी नझीर हुसैन, नवेंदु घोष, हृषीकेश मुखर्जी, पॉल महेंद्र हेही होते. बिमल रॉय बंगाल जिंकून आले होते. त्यांच्या वर्ष ४४ मधल्या ‘उदयेर पाथे’ने बंगालमधील तरुणाईचं लक्ष वेधलं होतं. ‘न्यू थिएटर्स’साठी ‘पहला आदमी’ हा चित्रपट पूर्ण करून मुंबईत ‘बॉम्बे टॉकीज’चा नवा चित्रपट करण्यासाठी अशोककुमार यांच्या निमंत्रणावरून ते आले होते.