

Vaishno Devi Medical College Controversy
esakal
जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशावरून वाद जोर धरत आहे. वैष्णोदेवी देवस्थान मंडळाच्या देणगी हाच या विद्यापीठाचा आर्थिक आधार आहे. त्यामुळे या विद्यापीठामध्ये हिंदू विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. तर, अशा पद्धतीने शैक्षणिक संस्थांत धर्माच्या आधारावर प्रवेशाचा मुद्दा निर्माण करू नये, अशी भूमिका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरच्या कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीसाठी ४२ मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यावरून राजकीय वाद उफाळून आला असून, त्यामुळे जम्मू व काश्मीर अशी उभी दरी निर्माण झाली आहे. या ४२ मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी भाजप आणि मित्रपक्षांनी केली आहे. तर, या विद्यार्थ्यांना ‘नीट’मधील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात आला आहे, त्यामुळे त्यांचे प्रवेश रद्द करू नयेत, अशी भूमिका अन्य राजकीय पक्षांनी घेतली आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, पीडीपी, अपनी पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स, कम्युनिस्ट पक्ष व अन्य पक्षांचा समावेश आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश आणि निवडीसाठी गुणवत्ता हाच निकष हवा, त्याला धर्माचा आधार नको, असे हे पक्ष म्हणत आहेत.