
सुनील चावके
केंद्रातील सरकार आणि भाजपच्या वतीने राष्ट्रवादाचा मुद्दा सर्वात प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असलेले पंतप्रधान मोदी यांनी २४ एप्रिलपासून बिहार, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यांचे दौरे करून ‘ऑपरेशन सिंदूर’वरून वातावरणनिर्मिती सुरू केली आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानविरोधातील प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा भाजपसाठी अधिक उपयुक्त ठरु लागला आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यापाठोपाठ भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली लष्करी कारवाई आणि स्थगित करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरुन निवडणुका नसतानाच्या काळात सुरु झालेला ‘ऑफ सीझन’ प्रचार त्याकडेच अंगुलीनिर्देश करतो आहे. भाजपच्या निवडणूकप्रचारातील हिंदुत्वाचा पारंपरिक मुद्दा काहीसा मागे पडून प्रखर राष्ट्रवाद केंद्रस्थानी आल्याचे दिसते.