

Mumbai municipal elections 2026
esakal
नुकत्याच घडलेल्यामहापालिका निवडणुकीमध्ये मुंबईसह परिसरातील नऊ महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने मारलेल्या या धडाक्यामुळे विरोधी पक्षांबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेमध्येही वाढ झाल्याचे मानले जाते. भाजपचे संघटन, नव्याने स्थायिक झालेल्या मतदारांची पसंती आणि विकासाच्या मुद्द्यांवर केलेला प्रचार या गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडल्याचे मानले जाते.
चार ते आठ वर्षे रखडलेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणूक अखेर पार पडल्या. अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या या निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यभरात झालेले तमाशे आणि पक्षांतरे विचारात घेता, लोकशाहीचे एवढे धिंडवडे कधीच निघाले नसावेत. हे सर्व नाट्य घडत असताना महत्त्वाचा, मात्र दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे मतदार. मतदाराने मात्र मतदानाच्या वेळी आपले कर्तव्य चोख बजावत प्रत्येक पक्षाला त्याची जागा दाखवून दिली आहे. कोणत्याच पक्षाला त्यांच्या नेत्यांना अपेक्षित असलेले निकाल न देता सर्वांचेच गर्वाचे घर खाली आणण्याचे काम मतदारराजाने केले आहे.
संपूर्ण देशाचे सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेवर लागून राहिलेले होते. गेली २५ वर्षांपासून शिवसेनेने सलगपणे मुंबई महापालिकेची सत्ता भाजपच्या साथीने आपल्या हाती ठेवली होती. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंच्या हातात राहणार की जाणार, या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक झाली होती. सत्तेच्या उन्मादात असलेल्या भाजपला कोणत्याही परिस्थितीत ही महापालिका आपल्याकडे खेचून आणायची होती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे ‘खरे-खोटे’पण सिद्ध करायचे होते. गेल्या वर्षाच्या मध्यापासूनच या निवडणुकांची चाहूल लागलेली होती. त्यातच ते शालेय शिक्षणातील हिंदीसक्तीला विरोध करता मराठी भाषेचा मुद्दा प्रामुख्याने पुढे आला. याच मुद्द्यावर मराठी माणसांसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसांच्या आशा-अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र निवडणूक ही केवळ भावनेवर लढविली जात नाही, तर त्यासाठी रणनीतीची गरज असते, याची जाणीव ठाकरे बंधू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्कीच झाली असेल.