
संजय कुमार, प्राध्यापक, सीएसडीएस अर्थात सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज
उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षांनी विधानसभा निवडणुका होत असून, भाजपकडून त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात महाकुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले आणि या यशाचा निवडणुकीमध्ये वापर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा राजकीय ऊर्जा मिळविण्यासाठी वापर करण्याला मर्यादा आहेत, असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे.
भारताला धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा दीर्घ वारसा आहे. कोट्यवधी भारतीयांनी या वारशाची जपणूक केली आहे. या वारशातूनच कोट्यवधी भारतीय नागरिकांमध्ये उत्साह निर्माण होतो. सामाजिक आणि सांस्कृतिक ऊर्जा मिळविण्यासाठी हा धार्मिक व सांस्कृतिक वारसा महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, राजकीय ऊर्जा मिळविण्याचा विचार करताना, हा वारसा अल्पायुषी ठरतो. सरकारची कामे, नेतृत्वाचे गुण आणि सामाजिक-राजकीय आघाड्या यांच्या आधारावर राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यामध्ये यशस्वी ठरतात. केवळ सांस्कृतिक व धार्मिक वारशाच्या बळावर राजकीय आघाडीवर यश मिळणे, त्याप्रमाणात शक्य होत नाही.