The Foundation of Indian Natural History: The Story of BNHS
Esakal
किशोर रिठे
१५ सप्टेंबर २०२५ रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला अर्थात बीएनएचएसला १४२ वर्षे पूर्ण झाली. बीएनएचएसचे कार्य अजूनही जोरात सुरू असून वन्य जीवसंशोधन, संवर्धन व पर्यावरण शिक्षणाच्या क्षेत्रात संस्थेने मोलाची कामगिरी बजावली आहे. या संस्थेने आज उत्तुंग भरारी घेत आपल्या विश्वासार्ह कामाने शिखर गाठले आहे.
भारताच्या निसर्ग इतिहासात विशेषतः ब्रिटिश कालखंडात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) संस्थेचे एक महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. वनविभागाची १८६५ मध्ये स्थापना झाल्यानंतर भारतात त्याचे काम सुरू झाले. या काळात जे ब्रिटिश अधिकारी स्थलसेना, महसूल, शिक्षण, आरोग्य व वनविभागामध्ये कार्यरत होते त्यातील काही पक्षी निरीक्षण, मासेमारी तसेच शिकारी असे छंदसुद्धा बाळगत होते. सोबतच ते यासंबंधी आपली निरीक्षणेही नोंदवत होते. त्यातील काही समविचारी लोकांच्या मुंबईत भेटी व्हायच्या.
यातूनच डॉ. डी. मॅकडोनाल्ड, ई. एच. एटकेन, कर्नल सी. स्विन्हो, जे. सी. अँडरसन, जे. जॉन्सन, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. जी. ए. मॅकोनोची आणि डॉ. सखाराम अर्जुन या आठ निसर्गप्रेमी व्यक्तींनी १५ सप्टेंबर १८८३ रोजी मुंबईत व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये एकत्र येऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना केली. त्या वेळी १८५५ मध्ये उभारलेले व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियम हे भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणिसंग्रहालयाशेजारी होते.