
डॉ. अजित कानिटकर
एकीकडे खेडेगावात बेरोजगारांची फौज आणि दुसरीकडे शेतीत काम करायला मजूर नाहीत किंवा असलेल्या मजुरांची मजुरी परवडत नाही, असे प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत. दररोज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला आपण समाज म्हणून कसे सामोरे जातो, ते स्वीकारतो, पचवतो; नाकारतो का गाफील राहून त्यात हरवून जातो, हे पाहणे यासंदर्भात महत्त्वाचे.
गेल्या आठवड्यात विदर्भातील एका गावामध्ये बैलपोळ्याच्या ऐवजी ‘ट्रॅक्टर पोळा’ साजरा झाल्याचे वृत्त काहींनी वाचले असेल. पंधराशे लोकवस्तीच्या या गावात काही वर्षांपूर्वी दीडशे बैल होते. त्यांची संख्या कमी कमी होत जेमतेम दहापर्यंत आली आणि दुसरीकडे ट्रॅक्टरची संख्या २५ पर्यंत वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलाची दखल घेत बैलांच्याऐवजी ट्रॅक्टरला सजवून त्यांचा पोळा साजरा केला! ही परिस्थिती म्हणजे गेल्या काही वर्षातील कृषी क्षेत्रात होणारे सततचे स्थित्यंतराचे उदाहरण व त्याहीपेक्षा येणाऱ्या काही वर्षात आणखी वेगाने होऊ घातलेले बदल याची काहीशी नांदी म्हणून बघावे लागेल.