

CBSE 10th Passing Rule
esakal
इयत्ता १० वीची बोर्ड परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि शिक्षकांचीही धाकधूक वाढते. अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न, अंतर्गत मूल्यमापन आणि त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘पास होण्यासाठी किती गुण हवेत?’ याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. यंदाही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सीबीएसईने जारी केलेल्या एका परिपत्रकातील शब्दरचनेमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना आता अंतर्गत मूल्यमापन आणि मुख्य बोर्ड परीक्षेत स्वतंत्रपणे ३३ टक्के गुण मिळवावे लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली. मात्र, सीबीएसईने नंतर याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे कनफ्युजन राहण्याचे काही कारण नाही.
सीबीएससीने या बाबत काय सांगितले? आणि हा संभ्रम नेमका निर्माण कशामुळे झाला होता? दहावी आणि बारावीच्या पासिंगच्या नियमांमध्ये काय फरक आहे? ८०:२० गुणांचा पॅटर्न पुढेही तसाच राहणार आहे का? सीबीएसईने नमुना प्रश्नपत्रिका आणि गुणदान पद्धती बाबत काय सांगितले आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेतली, तर दहावीच्या परीक्षेचं चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे नियमांमध्ये नेमका काय बदल झाला आणि काय बदल झालेला नाही, हे सोप्या भाषेत समजून घेऊया सकाळ+च्या या लेखातून
इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात CBSE ने बोर्डाने परीक्षेच्या उत्तीर्णतेच्या नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जे नियम लागू होते, तेच नियम यंदाही कायम राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विषय उत्तीर्ण होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन आणि मुख्य बोर्ड परीक्षा या दोन्हींचे गुण एकत्रितपणे विचारात घेतले जातील आणि या दोन्हींच्या मिळून किमान ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल.
याबाबत CBSE ने २१ सप्टेंबर रोजी आपल्या सर्व संलग्न शाळांच्या प्रमुखांना अधिकृत माहिती दिली आहे. याआधी उत्तीर्णतेच्या पद्धतीत बदल करण्याची चर्चा झाली होती. विद्यार्थ्यांना प्रत्येक घटकात किंवा विषयानुसार स्वतंत्रपणे किमान गुण मिळवणे आवश्यक करण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र, अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला असून, सध्याची एकत्रित गुणांची पद्धतच पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे. थोडक्यात सांगायचं तर, पासिंगच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांना यंदा कोणताही नवा बदल समोर ठेवण्यात आलेला नाही; मागील वर्षीचीच पद्धत यंदाही लागू राहणार आहे.