दुरवस्था मराठी संशोधनाची
डाॅ. केशव देशमुख
यंदा राज्यात मराठी भाषा विद्यापीठ सुरू झाले आहे. या विद्यापीठापुढे डोंगराएवढी आव्हाने उभी असतील. नव्या पिढीची चूल पेटावी यासाठी रोजगाराची मराठी या विद्यापीठास घडवावी लागेल. मराठीतील संशोधनाचा दर्जा सुधारावा लागेल.
शिक्षणक्रांती झाली हे खरे असले तरी या क्रांतीचा तपशील बघायला गेले म्हणजे त्यातील पोकळत्व लक्षात येते. त्यात पुन्हा मराठीची स्थिती पुष्कळच वाईट. विद्यापीठांतील मराठी तर फक्त धो धो शिकविणे, गरज म्हणून परीक्षा पार पाडणे आणि कोरड्या सेमिनारचा रतीब घालून पैसा उडविणे यातच अधिक रममाण झालेले दिसून येते.
उत्तम संशोधक नाहीत. मराठीला विद्यार्थीच नाहीत आणि जे येतात त्यांचा पायाभूत संशोधनाशी काडीचाही संबंध नाही. अशी मराठी एकप्रकारचे शोध-दारिद्र्य घेऊन उभी आहे. हे ढळढळीत वास्तव आहे.