

A Literary Journey Through Nature
esakal
प्रमोद चोबीतकर - sakal.avtaran@gmail.com
‘चंद्र पावलांचे ठसे’ हा सुनील यावलीकर यांचा ललित लेखसंग्रह म्हणजे निसर्ग आणि मानवी संवेदनांच्या सुंदर गुंफणीचा अनुभव आहे. त्यांच्या शब्दांतून साकारलेले ग्रामीण जीवन, आठवणी आणि निसर्गाचे बदलते रंग वाचकाला स्वतःच्या अनुभवविश्वात घेऊन जातात.
‘चंद्र पावलांचे ठसे’ हा सुनील यावलीकर यांचा ललित लेखसंग्रह वाचताना एक अनुभवविश्वच त्यांनी साकार केल्याचं जाणवतं. यातील ललितबंधात एक-दोन माणसांचीच पात्रं येत असली तरी लेखकाचा वावर मात्र साऱ्याच ललितबंधात दिसून येतो; पण तेसुद्धा निमित्तानेच. बव्हंशी त्यांची अनुभव प्रसवता ही आपल्या अवतीभोवती असलेली चेतन-अचेतन अशी झाडं, झुडपं, शिवारातील शेतं, त्यांचे बांध, नदी, नदीकाठ, बाभूळबन, पायवाटा, रस्ते, पाऊस, निसर्ग, चांदणं आणि या सर्वात चंद्राची बदलणारी व बदलत जाणारी विविध रूपं आपण अनुभवत असतो. या लेखसंग्रहातील ललितबंध वाचताना आपणच जणू हे सारं अनुभवत असल्याचं जाणवत राहतं.
यातील ललित लेखनाचा परीघ बालपण ते आजपर्यंत प्रत्ययास आलेल्या घटकांनी मनावर कोरलेल्या अनुभवापर्यंत विस्तारत गेल्याचं जाणवू लागतं. त्यांच्या या ललित लेखसंग्रहात चंद्र आपल्याला विविध रूप, स्वरूपात भेटत तर राहतोच; पण ऋतुगणिक, दिवसागणिक बदलणाऱ्या त्याच्या व निसर्गाच्या बदलणाऱ्या मोहमयी रूप-स्वरूपात आपल्याला सोबत नेतो. त्याची ही बदलणारी विविध मोहक रूपं आपल्याही मनात नकळत घर करू लागतात. खरंतर त्यातील वाचनाने त्यांचे ते अनुभवही आपल्याला आपलेसे वाटू लागतात.